ब्रेकिंग ! शॉर्टसर्किटमुळे निंबोणी येथील सौरऊर्जा प्रकल्पास आग; कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज 

हुकूम मुलाणी 
Monday, 16 November 2020

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निंबोणी येथील 33 केव्ही उपकेंद्रात बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील प्रकल्पास आज दुपारी अचानक विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निंबोणी येथील 33 केव्ही उपकेंद्रात बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील प्रकल्पास आज दुपारी अचानक विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

सोलर पॉवर जनरेटिंग सिस्टीम यांच्या अखत्यारीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून 657.2 केडब्ल्यूपी इतक्‍या क्षमतेच्या महावितरण कंपनीच्या निंबोणी येथील शाखा कार्यालयाच्या शेजारी 33 केव्ही उपकेंद्राच्या बाजूला रिकाम्या जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज तिथेच 33 केव्ही उपकेंद्रांत पुरवठा केला जात आहे. 

या प्रकल्पास आज दुपारी तीनच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात आवश्‍यक तितक्‍या प्रमाणात अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नाही. शिवाय, इतर ठिकाणी असलेली अग्निशामक यंत्रणा उपलब्ध झाली नाही. तसेच या कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांतील बहुतांश कर्मचारी दिवाळी सुटीवर गेले असून, उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्‍यात घालून ही आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यामुळे सौर प्रकल्पातील महत्त्वाची सामग्री या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने यात सौर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्यातून नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, हे स्पष्ट होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A short circuit caused a fire at a solar power plant in Nimboni