विजयादशमीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर पिवळ्याधमक झेंडू फुलांनी निघाले न्हाऊन 

भारत नागणे 
Sunday, 25 October 2020

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आजच्या विजया दशमीच्या निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात झेंडू फुलांची आरास करण्यात आली आहे. पिवळ्या धमक झेंडू फुलांनी देवाचा गाभारा सोनेरी तेजाने न्हाऊन निघाला आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आजच्या विजया दशमीच्या निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात झेंडू फुलांची आरास करण्यात आली आहे. पिवळ्या धमक झेंडू फुलांनी देवाचा गाभारा सोनेरी तेजाने न्हाऊन निघाला आहे. पुणे येथील विठ्ठलभक्त राम जांभूळकर यांनी ही झेंडू फुलांची आरास केली आहे. 

दसरा आणि झेंडू फुलांचे समीकरण मानले जाते. याच झेंडू फुलांनी श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचा गाभारा, प्रवेशद्वार व सोळखांबी सजवण्यात आला आहे. सोनेरी रंगाच्या या झेंडू फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. 

झेंडूबरोबरच तुळशीची पाने, मोगरा या फुलांच्या सजावटीने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. विजया दशमीच्या निमित्ताने विठ्ठलाला आज काळ्या रंगाचा अंगरखा आणि पांढरे धोतर असा पोषाख परिधान करण्यात आला आहे. तर रुक्‍मिणी मातेला जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे. 

विजयाचे प्रतीक म्हणून दसरा सण उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाचे सावट असले तरी आज आपट्याची पाने भेट देऊन अनेकांनी मैत्रीचे, स्नेहाचे आणि प्रेमाचे ऋणानुंबध अधिक घट्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Vitthal-Rukmini temple decorated with marigold flowers on the occasion of Vijayadashami