शुभांगी बोंडवे यांची तीन दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

  • बार्शी-सोलापूर रस्त्यावरील अपघातातील मृतांची संख्या सात 
  • शुभांगी बोंडवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू 
  • शुक्रवारी झाला होता एसटी व क्रूझरचा अपघात 
  • दोन जखमींवर सोलापुरात उपचार सुरू 

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी-सोलापूर रस्त्यावर शेळगाव-राळेरास शिवेवर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमार एसटी व क्रूझरच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शुभांगी चंद्रकांत बोंडवे (वय 35, रा. उपळाई रोड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा डॉक्‍टरांनी घोषित केले. या अपघातातील मृतांची संख्या आता सात झाली आहे. बार्शी पंचायत समिती कार्यालयात सोमवारी सर्व अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांनी शोकाकूल वातावरणात श्रद्धांजली वाहिली. 
बार्शी पंचायत समितीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभागात शुभांगी बोंडवे 2013 पासून कंत्राटी कर्मचारी म्हणून महिला बचत गटाचे काम करीत होत्या. सोलापूर येथील रुक्‍मिणी यात्रेसाठी महिला बचत गटाचे स्टॉल उभा करण्यासाठी बार्शी येथून शुक्रवारी सकाळी आठ वाजता क्रूझरने पंचायत समितीचे सर्व कर्मचारी निघाले होते. त्यांच्या वाहनाचा एका तासाच्या प्रवासानंतर भीषण अपघात झाला. यात शुभांगी गंभीर जखमी झाल्या होत्या. सोलापूर येथे खासगी रुग्णालयात मृत्यूशी तीन दिवस झुंज दिल्यानंतर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा असा परिवार आहे. 
या अपघातात चालक संदीप घावटे, छगन काळे, देवनारायण काशीद, राकेश मोहरे, संभाजी महिंगडे, वर्षा आखाडे अशा सहा जणांचा मृत्यू झाला होता. शुभांगी बोंडवे यांचे पार्थिव बार्शी येथे आणले. त्यानंतर ते हातकणंगले येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. शिवाजी महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर चंद्रकांत मोरबाळे यांच्या त्या पत्नी होत. उपळाई रस्त्यावरील क्रांतिसिंह प्रतिष्ठान सोसायटीच्या बोंडवे संचालिका होत्या. 
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या कविता चव्हाण व नृसिंह मांजरे यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shubhangi Bondways fight with the three day death ultimately failed