नितीन गडकरींचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या पंढरपूर महामार्गाचे काम "या' कारणावरून रखडण्याची चिन्हे !

Haighway
Haighway

मोहोळ (सोलापूर) : आळंदी-पंढरपूर-मोहोळ या नव्या 965 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे, मात्र मोहोळ शहरातील त्यासाठीची भूसंपादन प्रकिया हा अडथळा ठरणार असल्याचे चित्र आहे. मोहोळ नगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या या मार्गासाठी मिळणारी नुकसान भरपाई अतिशय कमी असल्याने स्थानिक मिळकतदार याला विरोध करणार आहेत, त्यामुळे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्‍ट रखडणार की काय? अशी चर्चा आता येथे जोर धरू लागली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की पंढरपूर हे देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्याच्या चारही बाजूंनी जवळच्या राष्ट्रीय महामार्गास जोडावे आणि मोठ्या वारीस मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांची प्रवासाची सोय व्हावी अशी अतिशय योग्य कल्पना ज्यांना "रोडकरी' म्हणून ओळख आहे अशा गडकरी यांनी गेल्या वर्षी मांडून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आळंदी ते वाखरी ते पंढरपूर हा मूळ पालखी मार्ग मोहोळपर्यंत आणि पुढे मंद्रूपपर्यंत "बीओटी' तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातून टेंडर काढणे, ठेकेदार नेमणे आदी प्रक्रियांना गतिमानता आली. ग्रामीण भागातून ज्यांच्या शेतातून हा रस्ता जातो त्यांच्या भूसंपादनासाठी "न भूतो न भविष्यति' असा दरही दिला. त्यामुळे रस्याच्या कडेचे अनेक शेतकरी अक्षरश: कोट्यधीश बनले आहेत. 

मात्र, मोहोळ शहरातील परिस्थिती नेमकी याच्या उलट झाली आहे. शहरात ज्यांच्या ज्यांच्या मिळकती जाणार आहेत त्यांना एका गुंठ्यास जवळजवळ सहा लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. खरी मेख या ठिकाणीच आहे. एकतर या सर्व मिळकती "एनए' आहेत आणि शहरात आतील भागातील खुल्या एका गुंठ्याचा बाजारभाव 20 ते 25 लाख असा आहे. अर्थातच हा कागदावर दिसत नाही. अशा स्थितीत आम्हाला मिळणारी नुकसान भरपाई खूपच तोकडी आहे, अशी भावना या मिळकतदारांची झाली आहे. त्यामुळे या रस्त्यास योग्य नुकसान भरपाई मिळेपर्यंत न्याय मार्गाने आमचा विरोध असेल, अशा प्रकारच्या सुप्त प्रतिक्रिया संबंधितांकडून येत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com