पंढरीतील चार्तुमासावरुन वारकरी अन्‌ प्रशासनात संघर्षाची चिन्हे 

भारत नागणे
Monday, 15 June 2020

आंदोलनाचा इशारा 
विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी चातुर्मासाठी काही मोजक्‍या महाराज मंडळींना पंढरपुरात राहाण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अन्यथा वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशाराही आज दिला आहे. याच वेळी राष्ट्रीय वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज यांनीही चातुर्मासात प्रमुख महाराजांना पंढरपुरात राहण्यास मुबा द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे. वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनालाच आंदोलनाचा इशारा दिल्याने ऐन आषाढी वारीच्या तोंडावर वारकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा रद्द केला आहे. देशावर आणि राज्यावर आलेले हे संकट निवारण्यासाठी राज्य सरकारच्या या निर्णयाला वारकऱ्यांनीही प्रतिसाद देत, पालखी सोहळ्यात सहभागी न होण्याचा मोठा निर्णय घेतला. दरम्यान, आषाढी ते कार्तिकी यात्रे दरम्यान पंढरपुरात चार महिने राहून चातुर्मास करण्यास देखील प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी (ता. 14) कुकूरमुंडे महाराजांना येथील प्रशासनाने परत त्यांच्या गावी पाठवल्याने वारकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

परंपरेने चातुर्मास करणाऱ्या प्रमुख महाराज मंडळींना पंढरपुरातील मठांमध्ये राहण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी महाराज मंडळींनी केली आहे. विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य तथा वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या संदर्भात लेखी निवेदन देवून चातुर्मास साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. वारकऱ्यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे ऐन आषाढी वारीच्या तोंडावर प्रशासन आणि महाराज मंडळी यांच्यातील संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

येत्या 1 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाची आषाढी पायी वारी रद्द केली आहे. वारी रद्द झाल्याने महाराज मंडळींसह देशभरातील विठ्ठल भक्त भावनावश झाले आहेत. आषाढी ते कार्तिक यात्रे दरम्यान चार महिने पंढरपुरातील मठात राहून विठ्ठल भक्ती करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्रातील प्रमुख महाराज मंडळींनी आजही पुढे चालू ठेवली आहे. ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर, ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूकर, ह.भ.प. नंदू महाराज कुकूरमुंडे, ह.भ.प. राऊत महाराज या प्रमुख महाराज मंडळींबरोबरच अनेक वारकरी दरवर्षी आषाढ शुध्द ते कार्तिक शुध्द एकादशीपर्यंत चार महिने पंढरपुरातील मठामध्ये राहून विठ्ठल भक्ती बरोबरच वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करतात. वारकरी संप्रदायामध्ये आजही चातुर्मासाला अन्यान्यय साधारण महत्व आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने पंढरपूर शहरातील सुमारे साडेचारशे हून अधिक मठ पुढील दोन महिने बंद ठेवण्याचे व मठात वारकर्यानी राहूनये असे आदेश दिले आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे फक्त चातुर्मासात पंढरीत राहाण्यार्या महाराज मंडळींची मोठी गैरसोय झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली चातुर्मासाची परंपरा खंडीत होण्याची भीती देखील महाराज मंडळींमधून व्यक्त केली जात आहे. 
आषाढी वारी रद्द केली असली तरी चातुर्मासात प्रमुख महाराज मंडळींना पंढपुरात येण्यापासून रोखू नये अशी मागणी विविध वाकरी संघटनांनी लावून धरली आहे. 

यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा 
आषाढ शुध्द देवशयनी एकादशी नंतर देव झोपी जातात. आणि कार्तिक शुध्द प्रबोधनी एकादशीला जागे होतात. या चार महिन्यांच्या कालखंडाला वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मास असे संबोधले जाते. चार महिन्यांच्या या काळामध्ये वारकरी देवाचे मनो भावे भजन करुन भक्तीचे जागरण करतात. या काळात पंढरपुरातील अनेक मठांमध्ये विठु नामाचा अखंड गजर चालतो. चातुर्मासामध्ये ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर, चौतन्य महाराज देगलूकर, नंदू महाराज कुकूरमंडुे यांच्यासह इतर महाराज मंडळी पंढरपुरातील आपल्या मठामध्ये चार महिने राहून विठ्ठल भक्ती करतात. याच दरम्यान ते वारकरी संप्रदायाचा व भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम ही करतात. यंदा अधिक मास आल्याने, पाच महिने चातुर्मास चालणार आहे. चातुर्मासातील भक्तीची मोठी परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्रातील प्रमुख महाराज मंडळींनी पुढे चालू ठेवली आहे. ह.भ.प. चैतन्य महाराज आणि प्रसाद महाराज अंमळनेकर महाराजांचे चातुर्मासातील प्रवचन आणि किर्तन ऐकण्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी दरवर्षी पंढरीत येतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signs of struggle in Warkari and administration from Chaturmas in Pandharpur