उच्चशिक्षित पवार बंधूंचा साधेपणा; ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून केला विवाह 

भारत नागणे 
सोमवार, 1 जून 2020

50 पीपीई किट भेट 
विवाह सोहळ्यातील उपस्थितांना मास्क आणि सॉनिटायझर देण्यात आले. तर पंढरपूर तालुका आरोग्य विभागाला 50 पीपीई किट आणि 100 लिटर सॉनिटायझर भेट देण्यात आले. उच्चशिक्षित पवार बंधूच्या या नोंदणी विवाह सोहळयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : लग्न म्हणजे वधू-वरांच्या आयुष्यातील आनंदाचा पर्मोच्च क्षण. हौस, मजा मस्ती आणि डामडौल असचं काहीसं चित्र लग्नात आपल्याला पाहायला मिळते. त्यातच दोघेही उच्चशिक्षित आणि शासकीय नोकरी करणारे असतील तर अधिकच थाटमाट आणि साजशृंगार केला जातो. यातून आपल्या श्रीमंतीचं ओंगळवाणे दर्शनही घडवले जाते. पण या सगळया गोष्टींना फाटा देत उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या पवार बंधूंचा कोणताही डामडौल न करता साध्या पद्धतीने व ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून विवाह सोहळा पार पडला. 
उंबरगाव येथील अजित पवार हे रेल्वेत इंजिनिअर या पदावर नोकरीला आहेत तर वैराग येथील सायली गोवर्धन ही सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता आहे. दुसरे बंधू सुधीर पवार हे एका खासगी कंपनीत इंजिनिअर आहेत. तर सोलापूर येथील ऐश्वर्या धिल्लू ह्या आरटीओ आहेत. दोन्ही वधूवर आणि त्यांचे नातेवाईक हे उच्चशिक्षित असून त्यांनी लॉकडाउनचे सर्व नियम आणि सामाजिक अंतर पाळून साध्या पध्दतीने घरासमोर विवाह सोहळा साजरा करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे. 
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनने विवाह सोहळे आणि इतर समारंभावर देखील मर्यादा आल्या आहेत. त्यातच जमवून ठेवलेले विवाह सोहळे पुढे ढकलण्याची अनेकांवर वेळ आली आहे. तर अनेक विवाह सोहळे अजूनही रखडले आहेत. लॉकडाऊन काळात पवार बंधूंचा कोणत्याही मुहूर्ताविना रविवारी साध्या पध्दतीने कमी खर्चात मोजक्‍याच पाहुण्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून विवाह सोहळा पार पडला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या हस्ते नव वधूवरांना विवाह नोंदणीचे सर्टिफिकेट ही देण्यात आले. विवाह सोहळ्यास पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,तालुका वैद्यकीय अधिकारी,विजय पवार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simplicity of highly educated Pawar brothers got married by registering in Gram Panchayat