बार्शी तालुक्‍यात आढळले नवीन सहा रुग्ण; एकूण संख्या 12 

प्रशांत काळे 
रविवार, 31 मे 2020

अद्याप 11 अहवाल प्रलंबित 
बार्शी येथील बीआयटी कॉलेज व वैराग भागातील साई आयुर्वेद कॉलेज कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल करण्याचे आज झालेल्या बैठकीत घोषित करण्यात आले आहे. शहरातील खासगी रुग्णालयाचे डॉक्‍टर या रुग्णांना मदतीस धावून येतील, असे आश्वासन यावेळी डॉक्‍टरांनी दिलेले आहे. तालुक्‍यातील अद्याप 11 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत असून रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या दहा जणांच्या अहवालामध्ये सहा जण पॉझिटिव्ह तर चार जण निगेटिव्ह आले, असून अद्याप 11 अहवाल प्रलंबित आहेत. बार्शी तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या 12 झाली, असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली. 
तालुक्‍यात शुक्रवार, शनिवारी घेतलेल्या स्वॅबमध्ये रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात शेंद्री येथील चार, जामगाव येथील एक, रातंजन येथील एक लहान मुलगी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाने जामगाव तसेच वैराग भागातील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन शेकडो जणांना होम क्वारंटाईन, संस्थात्मक क्वारंटाइन केले असून अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. बार्शी तालुक्‍यातील शेंद्री, जामगाव, वैराग या भागातील तीन रुग्ण प्रथम आढल्यानंतर ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने पाय रोवले असल्याची शंका आरोग्य प्रशासनाच्या लक्षात येत होती. जामगाव येथे कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर जामगाव येथील 11, वैराग येथील 6, बार्शी येथील खासगी रुग्णालयातील 1, शेंद्री येथील सात, बार्शी शहरातील 9, उक्कडगाव येथील 1 अशा 35 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील सहा जणांचे आहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांची संख्या रविवारी 12 झाली असून आरोग्य प्रशासन, नगर परिषद, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम यांची बैठक शनिवारी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six new patients found in Barshi taluka Total number 12