वाळू चोरी प्रकरणातील सहा जण पंढरपूर तालुक्‍यातून हद्दपार 

अभय जोशी 
Sunday, 10 January 2021

अनेक गुन्हे दाखल केल्यानंतर देखील वाळू चोरी करणाऱ्या सहा जणांना पंढरपूर तालुक्‍यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : अनेक गुन्हे दाखल केल्यानंतर देखील वाळू चोरी करणाऱ्या सहा जणांना पंढरपूर तालुक्‍यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत. 
पंढरपूर शहर आणि तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील भीमा नदीपात्रातून अनेक वाळू चोर सातत्याने अहोरात्र वाळू चोरी करत आहेत. पोलिस आणि महसूल विभागाकडून अधूनमधून या वाळू चोरांच्या विरोधात कारवाई केली जात होती. अनेक वाळू चोरांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. परंतु तरीही वाळू चोरांकडून वाळू चोरी सातत्याने केली जाते. 
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी वाळू चोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाळू चोरांना लगाम घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण पवार आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी वारंवार वाळू चोरी करणाऱ्या आरोपींची यादी तयार केली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या आरोपींच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावणी होऊन श्री. ढोले यांनी सहा आरोपींपैकी काही जणांना सहा महिन्यासाठी तर काही जणांना पाच महिन्यासाठी पंढरपूर तालुक्‍यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. 
हद्दपारी करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : सूरज विष्णू पवार (जुनी वडार गल्ली, पंढरपूर), महादेव बाळू काळे (जुनी वडार गल्ली, पंढरपूर), राजू उर्फ रामा तिम्मा बंदपट्टे (संतपेठ, पंढरपूर), लहू बाबू चव्हाण (ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, पंढरपूर), नागेश शिवाजी घोडके (बोहाळी, ता. पंढरपूर), ऋतिक उर्फ दादा अरुण लामकाने (पिराची कुरोली, ता. पंढरपूर). 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six persons involved in sand theft case deported from Pandharpur taluka

टॉपिकस