...म्हणून फेटा बांधत नव्हते भारत भालके 

हुकुम मुलाणी 
Saturday, 28 November 2020

2009 साली 35 गावातील जनतेने पाण्यासाठी बहिष्कार टाकल्यानंतर ही गावे आणि त्यांचा पाणी प्रश्न राजकीय व्यासपीठावर अधिक प्रमाणात चर्चेला अशा परिस्थितीत पाणी प्रश्नाचे हत्यार हातात घेत आमदार भारत भालके यांनी पाठपुरावा सुरू केला. या भागातील शेतीला पाणी मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा देखील केली. 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या झळा सोसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना नाकी नऊ आलेल्या तालुक्‍याला आतापर्यंत लाभलेल्या आमदारांमध्ये भारत भालकेची 15 वर्षाच्या कारकिर्द लक्षात राहणारी ठरली. त्यांनी भगिनींच्या डोक्‍यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्यासाठी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही योजना मैलाची दगड पार करणारी ठरली. पाणी प्रश्नाची निम्मी लढाई मी जिंकली आता उर्वरित 35 गावाची लढाई जिंकली म्हणजे मी जनतेला दिलेल्या शब्दात मुक्त झालो, ही भावना मनात ठेवत पाठपुरावा सुरू केला परंतु दुर्दैवाने हा पाठपुरावा अखेर अर्ध्यातच राहिला. या भागातील शेतीला पाणी मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा देखील केली होती. 

मंगळवेढा आणि पाचवीला पुजलेला दुष्काळ हे समीकरण जणू कायम राहिले. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तालुक्‍यामध्ये पिढ्यानपिढ्या भेडसावत असताना तालुक्‍याला उजनीच्या हक्काचे अपेक्षित पाणी मिळत नाही. म्हैसाळचे पाणी तालुक्‍याला मिळत नव्हते. अरळी बंधाऱ्याचे पाणी तेल धोंड्याला, गुंजेगाव बंधाऱ्यातील पाणी 40 धोंड्याला अशा योजना लोकांसमोर मांडल्या परंतु त्या योजनांची पूर्ती होण्याच्या संदर्भातील अपेक्षित पाठपुरावा प्रयत्न होत नव्हता. म्हणून 2009 साली 35 गावातील जनतेने पाण्यासाठी बहिष्कार टाकल्यानंतर ही गावे आणि त्यांचा पाणी प्रश्न राजकीय व्यासपीठावर अधिक प्रमाणात चर्चेला अशा परिस्थितीत पाणी प्रश्नाचे हत्यार हातात घेत आमदार भारत भालके यांनी पाठपुरावा सुरू केला. या भागातील शेतीला पाणी मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा देखील केली. 

सुरुवातीला 35 गावाला पाणी देण्यासाठी उजनी धरणात पाणी शिल्लक नव्हते तरीही पाण्याची तरतूद करण्यासाठी त्यांनी वाल्मी समिती नेमण्यात भाग पाडून त्यामध्ये पाणी शिल्लक असल्याचे दाखवून दिले त्यासाठी प्रशासकीय मान्यता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला परंतु मागील पाच वर्षात या पाणीप्रश्न मध्ये तत्कालीन भाजप सरकारने अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावला शेवटी राज्यशासनाला प्रतिज्ञापत्र देण्यास भाग पाडले. मागील सरकारने या मधील गावे आणि पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर सत्ता बदल झाला. या सत्ता बदला लाभ घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेत सर्व गावे या योजनेत समाविष्ट होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू केला. 

उजनीतून तालुक्‍याला मिळणारे पाणी पूर्ण मिळावे यासाठी रखडलेल्या कामासाठी निधी प्राप्त करून घेतला, लाभ क्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळण्यासाठी अधिकाऱ्याची सातत्याने संपर्कात राहिले. सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने पाणीप्रश्‍नासाठी सातत्याने विधानसभेत आवाज उठवत अखेर म्हैसाळचे पाणी तलावात आणत केलेल्या पाठपुराव्याचे समाधान मानत त्यांनी पाणी पूजनाचे श्रेय शिरनांदगी च्या महिला सरपंच भगिनींना दिले. पाणी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची त्यांची साथ सोडत विरोधी पक्षांशी घरोबा केला.त्यावेळी जोपर्यंत मी जनतेच्या मनात आहे तोपर्यंत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास व दिलेल्या शब्दाला मी बांधील आहे. या भूमिकेत जनतेच्या सुख दुखात जनतेबरोबर राहिल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नेते बरोबर नसताना केवळ जनतेच्या पाठबळावर आमदारकीची हॅट्रीक मिळविली. 

संपादन : अरविंद मोटे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... so Bharat Bhalke was not wearing a feta