
सोलापूर जिल्ह्यातील चार हजार 684 शाळा असून त्याअंतर्गत तीन लाख चार हजार 527 मुले शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शिक्षकांना कोरोना टेस्ट बंधनकारक केली असून आतापर्यंत 25 टक्क्यांपर्यंत शिक्षकांचेच अहवाल आले आहेत. त्यात दोनशेहून अधिक शिक्षक बाधित आढळले असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 12 जणांचा समावेश आहे.
सोलापूर : राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या एक लाख सहा हजार 491 शाळा आजपासून (ता. 27) सुरू होणार आहेत. पहिल्यांदा 50 टक्के उपस्थिती राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील चार हजार 684 शाळा असून त्याअंतर्गत तीन लाख चार हजार 527 मुले शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शिक्षकांना कोरोना टेस्ट बंधनकारक केली असून आतापर्यंत 25 टक्क्यांपर्यंत शिक्षकांचेच अहवाल आले आहेत. त्यात दोनशेहून अधिक शिक्षक बाधित आढळले असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 12 जणांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात 520 शिक्षक असून त्यातील 189 जणांचे अहवाल आले आहेत. त्यात एक बाधित आढळला असून करमाळा तालुक्यात एक, पंढरपूर तालुक्यात तीन, माळशिरस तालुक्यात तीन, दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार शिक्षक बाधित आढळले आहेत. दुसरीकडे सांगोला तालुक्यातील 598, माढा तालुक्यातील 612, करमाळा तालुक्यातील 360, पंढरपूर तालुक्यातील 925, सोलापूर शहरातील एक हजार 872, बार्शीतील 988, माळशिरस तालुक्यातील 715, अक्कलकोट तालुक्यातील 599, दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक हजार 284, उत्तर सोलापूर तालुक्यातील 429, मोहोळ तालुक्यातील 375 जणांची टेस्ट करण्यात आली आहे.
यापैकी माढा तालुक्यातील 612 पैकी 361 जणांचे अहवाल आले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील 599 पैकी 280 जणांचे अहवाल आले आहेत. दरम्यान, नववी ते बारावीच्या 22 हजार 204 पैकी राज्यातील 21 हजार 289 शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात 56 लाख 48 हजार 28 मुलांपैकी 22 लाखांपर्यंत मुले उपस्थित राहू लागले आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 87 शाळांपैकी एक हजार 85 शाळा सुरू झाल्या आहेत. अडीच लाखांपैकी दोन लाख मुले शाळेत येत आहेत. सोलापूर शहर- जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या चार हजार 684 शाळा असून त्यात तीन लाख चार हजार 527 मुले आहेत. त्यापैकी दीड लाख मुले पाहिल्या दिवशी उपस्थित राहतील, असा विश्वास शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी व्यक्त केला आहे.
शाळा 11 ते 2 वाजेपर्यंत असणार आहे. शाळा सुटल्यानंतर कोणत्याही मुलाला थांबवून ठेवू नये, मुलगा शाळेत आला म्हणजे त्याच्या पालकांची अलिखित संमती आहे, असे समजावे. विनाकारण लेखी संमतीसाठी त्याच्या मागे तगादा लावू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षणाधिकारी म्हणाले...
पाचवी ते आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र, 70 टक्क्यांहून अधिक शिक्षकांचे कोरोना टेस्ट अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार 277 पैकी एक हजार 766 शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 12 शिक्षक बाधित आढळले आहेत. अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने संबंधित शिक्षकांनी मुलांपासून दूर राहावे, त्यांनी शाळेत प्रवेश करताना तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासणी करावी आणि मास्क घालणे बंधनकारक असेल, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तर लक्षणे असलेल्या शिक्षकांनी त्यांचा अहवाल येईपर्यंत वर्गावर जाऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थिती कोरोनाची...
संपादन : श्रीनिवास दुध्याल