In Solapur 91 percent of people over the age of 51 death from the corona virus
In Solapur 91 percent of people over the age of 51 death from the corona virus

कोरोना : सोलापुरात 51 वर्षावरील 91 टक्के व्यक्तींचा मृत्यू

Published on

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. 12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. रुग्ण मयत झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. अवघ्या दोन महिन्याच्या आतच कोरोनाने सोलापुरातील 94 व्यक्तींचा बळी घेतला आहे. सोलापूरचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक असल्याने सर्वांच्याच झोपा उडाल्या आहेत. सोलापुरात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्‍तींची संख्या, वयोगट आणि त्यांच्या इतर आजाराची पडताळणी केल्यास सोलापूरकरांना तात्पुरता दिलासा मिळेल. मृत पावलेल्या व्यक्‍तींपैकी 68 टक्के व्यक्तींना कोरोनाशिवाय इतर आजार असल्याचे समोर आले आहे. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
12 एप्रिल ते 28 मे या 50 दिवसांच्या कालावधीत सोलापुरातील 82 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 51 वर्षावरील व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण 91.75 टक्के आहे. फुफुसाचा अतिसंसर्ग होण्याचे प्रमाण वाढत्या वयाप्रमाणे वाढतच असल्याचेही आरोग्य विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. प्रदीप ढेले, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही पाहणी (कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची इतर माहिती) केली आहे. रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रमाणही वाढत्या वयाप्रमाणे वाढले आहे. 
कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत्या वयाप्रमाणे वाढत असल्याचेही आरोग्य विभागाच्या पाहणत समोर आले आहे. 51 वर्षाच्या पुढील व्यक्तींना कोरोनाचा धोका जास्त आहे. 20 वर्षाखालील व्यक्तींमधील मृत्यूचे प्रमाण शून्य असून ही सोलापूरसाठी जमेची बाजू आहे. 21 ते 30 या वयोगटातील एका महिलेचा मृत्यू असून या महिलेला रक्‍तदाबाचाही त्रास असल्याचे समोर आले आहे. पन्नास टक्‍क्‍या पेक्षा जास्त मृत्यू हे रुग्ण दाखल होण्याच्या 24 तासाच्या आत झाल्याचेही या पाहणीत समोर आले आहे. शेवटच्या टप्प्यात रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने अशा रुग्णांना वाचविणे कठीण जात आहे. 

मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे वयोगटानूसार वर्गीकरण 
वयोगट मृत संख्या टक्केवारी 
20 वर्षापर्यंत 00 00.00 
21-30 01 1.21 
31-40 00 00 
41-50 06 7.50 
51-60 22 26.89 
61-70 30 36.82 
70 वर्षावरील 23 28.04 

हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा कालावधी व मृत्यूचे प्रमाण 
कालावधी एकूण मृत्यू मृत्यूची टक्केवारी 
6 तासापेक्षा कमी 14 17.07 
6 ते 24 तास 22 26.82 
1 ते 5 दिवस 31 37.80 
6 ते 10 दिवस 10 12.19 
10 पेक्षा जास्त दिवस 5 6.09 

पूर्वीचे शारीरिक आजार व कोरोनामुळे झालेला मृत्यू 
पूर्वीचा शारीरिक आजार एकूण मृत टक्केवारी 
उच्च रक्तदाब 12 14.63 
मधुमेह 10 12.19 
उच्च रक्तदाब व मधुमेह 17 20.73 
उच्च रक्तदाब व हृदयविकार 01 01.21 
हृदयविकार 09 10.97 
गरोदरपणातील उच्च रक्तदाब 01 01.42 
मेंदूत रक्तस्त्राव 01 01.21 
उच्च रक्तदाब व किडणी विकार 01 01.21 
झटके येणे 01 01.21 
मधुमेहामुळे किडणी विकार 02 2.43 
मधुमेह, हृदयविकार, रक्तस्त्राव 01 1.21 
वरील पैकी कोणताही आजार नसलेले 26 31.70 

मधुमेह, रक्तदाब रुग्णाला सर्वाधिक धोका 
या पाहणीत 82 रुग्णांपैकी 30 रुग्ण म्हणजे 36.85 टक्के रुग्ण हे मधुमेह किंवा मधुमेह, रक्तदाब या आजाराचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे. अशा व्यक्तींमध्ये आगोदरच प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे कोरोना विषाणूला चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकत नाहीत. त्यांना बरे होण्यासाठी जास्तीचा कालावधी लागतो. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असल्यास विषाणू जिवंत राहण्याचे प्रमाणही जास्त असते. बहुतांश व्यक्ती या मधुमेहाचा योग्य उपचार न घेतल्यामुळे अनियंत्रित मधुमेह अशा परिस्थितीत असतात. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक धोका त्यांना आहे. काही रुग्णांवर रक्तदाबामुळे हृदयविकार व हृदयाच्या कामकाजावर परिणाम झाल्याचेही या पाहणीत समोर आले आहे. अशा रुग्णांना कोरोनाच्या उपचारासाठी दिलेल्या औषधोपचाराचा ही योग्य परिणाम झालेला दिसून येत नाही. 

हृदय विकार व कोरोना मुळे मृत्यू 
82 पैकी 11 म्हणजेच 13.14 टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे झाले आहेत. हृदयविकार असलेले रुग्ण हे रक्त पातळ करण्याचे औषध घेत होते. त्यांच्या हृदयाचे काम चाळीस टक्‍क्‍यावर आल्याने तसेच इतर तपासण्या या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेकडे जात असल्याचेही समोर आले आहे. यापैकी एका रुग्णास हृदय विकार अचानकपणे तीव्र झाल्याने मृत्यू झाला आहे. 


जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर म्हणाले, सोलापुरात कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे हे जरी खरे असले तरीही सोलापुरात कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आज (गुरुवारी) सकाळपर्यंत सोलापुरातील 469 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सोलापूर शहरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची यंत्रणा तत्पर आहे. ज्या व्यक्तींना त्रास होत असेल अशा व्यक्तींनी तत्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. मृत पावलेले बहुतांश रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात दवाखान्यात दाखल झाले होते. रुग्ण शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर सर्व सुविधा असूनही या रुग्णांना वाचविणे शक्‍य होत नाही. कोरोनाचे लवकरच निदान झाल्यास लवकर उपचार करणे शक्‍य होईल. त्यामुळे वेळेवर रुग्णालयात येणे आवश्‍यक आहे. सोलापुरात आतापर्यंत मृत झालेल्या व्यक्तींमध्ये ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. अशा व्यक्तींना स्वतंत्र ठेवण्यासाठी, त्यांच्या इतर आजाराच्या वैद्यकीय तपासण्या नियमित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचा पुढाकार आवश्‍यक आहे. कोरोना मुक्तीसाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना सोलापुरातील नागरिकांनी साथ दिल्यास सोलापूर कोरोनामुक्त होईल. नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com