सोलापुरात एकाच अधिकाऱ्याकडे पाच गावांच्या प्रशासकाचा कारभार 

संतोष सिरसट 
Friday, 28 August 2020

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 
अक्कलकोट, मंगळवेढा प्रत्येकी-15, उत्तर सोलापूर-6, करमाळा-21, दक्षिण सोलापूर-22, पंढरपूर-17, मोहोळ-11, सांगोला-16, एकूण-123. 

सोलापूर ः जिल्ह्यातील ऑगस्टअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 123 इतकी आहे. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत या ग्रामपंचायतींचा कालावधी संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. पण, त्यामध्ये थोडाशी गडबड झाली आहे. एकेका अधिकाऱ्यांकडे तब्बल पाच ग्रामपंचायतींचा कारभार दिला आहे. त्यामुळे त्या एका व्यक्तिकडून त्या ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित होणार का? याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांनी प्रशासक नियुक्तीचा आदेश काढला आहे. राज्यात कोरोनाची स्थिती बिकट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणुका घेणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे ऑगस्टअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले आहेत. प्रशासक नेमण्यावरुन बऱ्याच घडामोडी घडल्या. ग्रामविकासमंत्र्यांनी सुरवातीला पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासक नेमण्याचा आदेश दिला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. काही जणांनी त्या गावातील पोलिस पाटलांना प्रशासक करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याचाही विचार केला नाही. काहीजण याविषयी न्यायालयात गेले होते. शेवटी प्रशासक म्हणून शासकीय व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यभर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे देण्यात आला आहे. 

ग्रामपंचायतींची संख्या जास्त आहे. तेवढ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची संख्या नसल्याने एका अधिकाऱ्यांकडे पाच गावांचा कारभार देण्याची वेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर आली आहे. 123 ग्रामपंचायती या ऑगस्ट अखेर मुदत संपणाऱ्या आहेत. याशिवाय सप्टेंबर, ऑक्‍टोबर, नोव्हेंबर या महिन्यातही मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने त्यावेळी कोणता निर्णय घेतला जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामविकासमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी देण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, ती अपूर्णच राहिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur, the administrator of five villages is under one officer