सोलापूर भाजपत देशमुखी, कारभार होईल का एकमुखी? 

संतोष सिरसट 
रविवार, 5 जुलै 2020

सोलापूर ः गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेली भाजप जिल्हाध्यक्षांची निवड प्रदेश भाजपने शुक्रवारी जाहीर केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेल्या श्रीकांत देशमुख यांच्या खांद्यावर भाजपने जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे. तालुक्‍यापुरते मर्यादित असलेल्या देशमुखांना जिल्ह्याचा आवाका पेलणार का? हे भविष्यातील त्यांच्या कामगिरीवरच ठरणार आहे. भाजपचे दोन आमदार देशमुख आहेत. सोलापूर शहराध्यक्ष देशमुख आमि आता जिल्हाध्यक्षही देशमुखच झाले आहेत. त्यामुळे भाजपमधील देशमुखीचा कारभार एकमुखी चालणार का? याबाबत उत्सुकता आहे. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्याला विशेष निमंत्रितांच्या यादीत स्थान दिले आहे. 

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मागील साडेसहा वर्षापासून शहाजी पवार यांच्याकडे होती. या कार्यकाळात राज्यात व देशातही भाजपची सत्ता आली होती. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील भाजप वाढविण्यासाठीही त्याचा फायदा झाला. राज्यात सत्ता असताना जिल्ह्यातील अनेक सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले होते. सोलापूर शहरात माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून दोन मंत्रिपदे मिळाली होती. त्याचाही फायदा भाजपला झाला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा या दोन्ही जागा पक्षाला जिंकता आल्या. म्हणजेच मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा चांगलाच फायदा पक्षाला झाला. संघटनात्मक पातळीवर चांगले काम केल्यामुळे हे यश मिळाल्याचे पक्षाच्यावतीने वारंवार सांगितले गेले. एकीकडे हे यश मिळत असताना मंत्री असलेल्या दोन्ही देशमुखांमधली जुगलबंदीही जिल्ह्याला पाहायला मिळाली. त्यातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याचा फायदा पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झाला. त्याचबरोबर माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीही पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्यारुपाने चांगला वक्ता पक्षाला मिळाला आहे. त्याचाही फायदा भविष्यात पक्षाला होण्याची शक्‍यता आहे. 

सांगोल्याचे तालुकाध्यक्ष करण्याची मागणी श्रीकांत देशमुख यांनी यापूर्वी केली होती. पण, त्यांना ती संधी दिली जात नव्हती. मात्र, त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांशी कनेक्‍शन वाढविल्याने त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी त्यांना विरोध करणाऱ्यांचा श्री. देशमुख बदला घेणार का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. श्री. देशमुख हे माजी पालकमंत्री देशमुख यांच्या गटाचे असल्याचे मानले जाते. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही श्री. देशमुख यांनी आपले स्थान बळकट केल्याचे स्पष्ट होते. आता श्रीकांत देशमुख हे पदाला कितपत न्याय देतात हे येणारा काळच ठरवेल हे मात्र निश्‍चित. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur bjp leads deshmukh