धक्‍कादायक ! शहरातील मिळकतीच्या नोंदी अद्ययावत नाहीत; 'एवढ्या' मिळकती नोंदणीकृत 

तात्या लांडगे
Wednesday, 16 September 2020

मिळकतीतून मिळणारी कर वसुली कमीच 
शहरात दोन लाख 21 हजार 601 नोंदणीकृत मिळकती आहेत. शहर भागातील नोंदणीकृत मिळकतीपासून महापालिकेस 228 कोटी, तर हद्दवाढ भागातील मिळकतीपासून 180 कोटींचा कर अपेक्षित आहे. मागच्या वर्षी शहरातील मिळकतीतून 79 कोटी आणि हद्दवाढ भागातील मिळकतदारांकडून 71 कोटींचा महसूल मिळाला आहे. 
- प्रदीप थडसरे, कर आकारणी प्रमुख, सोलापूर महापालिका

सोलापूर: शहराचा विस्तार वाढू लागला असून मिळकतीची संख्याही मोठी झाली आहे. 2011 च्या तुलनेत आता शहराची लोकसंख्याही वाढली असतानाही मिळकतीच्या नोंदी मात्र, जुन्याच असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत शहरातील दोन लाख 21 हजार 601 मिळकतीच्या नोंदी महापालिकेकडे असून त्यातून दरवर्षी महापालिकेला कराच्या स्वरुपात 308 कोटी रुपयांचा कर मिळतो. मात्र, 2019-20 मध्ये केवळ 150 कोटींचीच वसुली झाली आहे. मिळकतीच्या नोंदी दोन वर्षांत अद्ययावत न केल्याने महापालिकेस दरवर्षी 50 ते 60 कोटींचा फटका बसत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

महापालिकेत भाजपची सत्ता असून मागील तीन वर्षांत एकदाही बजेट मिळाले नसल्याने सत्ताधारी नगरसेवकच मंगळवारी (ता. 15) झालेल्या सर्वसाधारण सभेत चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यंदा कोरोनामुळे महापालिकेचे बजेट मंजूर झाले नसल्याने विकासकामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. सर्व कर्मचारी कोरोना ड्यूटीसाठी गुंतल्याने कर वसुलीकडे दुर्लक्षच झाले आहे. तर लॉकडाउनमुळे अनेकांनी पैसे नसल्याचे कारण देत कर भरण्यासाठी मुदत मागितली आहे. दरम्यान, कर न भरणाऱ्यांची नावे त्या त्या भागात फलक लावून प्रसिध्द करण्याचा अनोखा फंडा महापालिकेने काही महिन्यांपूर्वी सुरू केला होता. परंतु, मालमत्ता विक्री करून तथा हस्तांतर करूनही पूर्वीच्याच व्यक्‍तीची नावे त्या फलकावर आल्याने अनेकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर महापालिकेने तो प्रकारच बंद करून टाकला. तत्कालीन आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मिळकतीच्या नोंदी अद्ययावत करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतर अद्याप बहुतांश मिळकतीच्या नोंदी अद्ययावत झालेल्या नाहीत. नगरसेवक चेतन नरोटे यांनी याच मुवर बोट ठेवत शहरातील मिळकतींचा सर्व्हे करून सर्व नोंदी अद्ययावत केल्यास महापालिकेस आणखी 100 कोटी रुपये वाढीव मिळतील, असा विश्‍वास सर्वसाधारण सभेत व्यक्‍त केला होता. त्यावर आता प्रशासन व सत्ताधारी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे. 

मिळकत नोंदीची सद्यस्थिती 

शहरातील मिळकती

 • रहिवाशी 
 • 60,962 
 • कर्मशियल मिळकती 
 • 10,479 
 • घरगुती-बिगरघरगुती मिश्र मिळकती 
 • 7,961 
 • खुले प्लॉट 
 • 8,792 
 • अपेक्षित कर वसुली 
 • 228 कोटी 
   

हद्दवाढ भागातील मिळकती

 • रहिवाशी 
 • 71,859 
 • कर्मशियल 
 • 3,434 
 • मिश्र मिळकती 
 • 2,647 
 • खुले प्लॉट 
 • 55,467 
 • अपेक्षित कर वसुली 
 • 180 कोटी 

 
मिळकतीतून मिळणारी कर वसुली कमीच 
शहरात दोन लाख 21 हजार 601 नोंदणीकृत मिळकती आहेत. शहर भागातील नोंदणीकृत मिळकतीपासून महापालिकेस 228 कोटी, तर हद्दवाढ भागातील मिळकतीपासून 180 कोटींचा कर अपेक्षित आहे. मागच्या वर्षी शहरातील मिळकतीतून 79 कोटी आणि हद्दवाढ भागातील मिळकतदारांकडून 71 कोटींचा महसूल मिळाला आहे. 
- प्रदीप थडसरे, कर आकारणी प्रमुख, सोलापूर महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur City income records are not up to date