करदात्यांना आजपासून भरता येणार ऑफलाइन कर ! ऑनलाईनचे काम पाहणारा कंत्राटदार पसार

3sakal_exclusive_1 (1).jpg
3sakal_exclusive_1 (1).jpg

सोलापूर : शहरातील नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाने शास्तीत सवलत देणारी अभय योजना सुरु केली. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत सवलत देण्यात आली असून ऑनलाइन करभरणा करणाऱ्यांसाठी ही सवलत आहे. मात्र, महापालिकेने पैसे न दिल्याने 'जीआयएस'चे काम पाहणारा मक्‍तेदार पैसे न दिल्याने तो पसार झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन करभरणा प्रक्रिया बंद पडली असून करदात्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर करदात्यांना उद्यापासून (गुरुवारी) महापालिकेत ऑफलाइन कर भरता येणार आहे.


'त्या' मक्‍तेदारावर कारवाई नाहीच
महापालिकेतील करदात्यांची माहिती असलेला मक्‍तेदार 'जीआय'चे काम बंद करुन पुण्याला गेला आहे. महापालिकेने ठरल्याप्रमाणे रक्‍कम दिली नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तत्पूर्वी, महापालिकेकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा काहीच प्रयत्न झाला नाही. आता त्यांच्याकडील डाटा घेईपर्यंत काहीच करता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्या मक्‍तेदाराना कायदेशीर नोटीस देऊन कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे ऑनलाइन प्रणाली बंद पडल्याने करदात्यांना कर भरता आला नाही. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांना शास्तीच्या रकमेत 60 टक्‍के सवलत देण्याचा विचार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेने यंदा जवळपास चारशे कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्टे ठेवले होते. मात्र, वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनाचे संकट आले आणि आर्थिक परिस्थितीच बिघडली. 2020- 21 मध्ये महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत 76 कोटींपर्यंतच कर जमा झाला आहे. 16 जानेवारीला ऑनलाइन यंत्रणा हाताळणारा मक्‍तेदार काम बंद करुन गावी परतला आहे. तरीही महापालिकेकडून काहीच कारवाई तथा कार्यवाही केलेली नाही. जानेवारीअखेर करदात्यांना शास्तीत 60 टक्‍क्‍यांची सवलत मिळणार आहे. तर फेब्रुवारी व मार्चमध्ये 50 टक्‍के सवलत दिली जाणार आहे. मात्र, नगारिकांना मागील 12 दिवसांपासून ना ऑनलाइन ना ऑफलाइन कर भरता आला. तिजोरीत खडखडाट असतानाही महापालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे करदाते आता कर न भरण्याची भूमिका घेऊ लागले आहेत. दरम्यान, करदात्यांना मॅन्युअली पावती देऊन कर भरणा करुन घेतला जाणार आहे.


ऑनलाइन करभरणा बंद असल्याने घेतला निर्णय
ऑनलाइन कर भरणा बंद असल्याने आता करदात्यांसाठी महापालिकेत ऑफलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्यासाठी परवानगी दिली असून गुरुवारपासून (ता. 28) करसंकलन कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था असेल. 
- जमीर लेंगरेकर, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com