2Agriculture_20water.jpg
2Agriculture_20water.jpg

मोठी बातमी ! भिमा नदीतून शहराला यापुढे मिळणार नाही पाणी; महापालिकेने पाटबंधारे विभागाला दिला बॉण्ड

सोलापूर : सोलापूर-उजनीपर्यंत पाईपलाईनचे काम सुरु झाले असून हे काम फेब्रुवारी 2022 पर्यंत संपविण्याचे नियोजन आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरासाठी भीमा नदीतून सोडणारे पाणी कायमस्वरुपी बंद केले जाणार आहे. तसे महापालिकेने पाटबंधारे विभागाला लेखी दिले आहे. नव्या पाईपलाईनमधून 110 एमएलडी पाणी मिळणार असून जुन्या पाईपलाईनमधून सध्या 70 एमएलडी पाणी घेतले जात आहे. वास्तविक पाहता शहराची गरज 200 एमएलडीपर्यंत असतानाही महापालिकेने लिहून दिलेल्या बॉण्डचा पुन्हा पश्‍चातापच करावा लागणार आहे. 

वितरण व्यवस्था बदलल्याशिवाय नियमित पाणी नाहीच 
शहरातील नीलम नगर, जुना अक्‍कलकोट रोड, जुना कुंभारी रोड, विनायक नगर, एसआरपी कॅम्प, देसाई नगर, विमानतळमागे, शेळगी परिसरातील मश्रुम गणपती परिसर याठिकाणी वितरण व्यवस्थेची क्षमता वाढवावी लागेल. तर ज्याठिकाणी वितरण व्यवस्था नाहीच, अशा ठिकाणी नवीन व्यवस्था (टाक्‍या आणि नवीन पाईपलाइन) करावी लागेल. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे 350 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो प्राथमिक स्तरावरच आहे. त्यामुळे आणखी काही महिने सुरळीत पाणीपुरवठ्याठी प्रतीक्षाच करावी लागेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सिध्देश्‍वर उस्तुरगे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. तर लोधी गल्ली, लष्कर यासह अन्य काही भागात पाणी चोरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


सोलापूर शहरासाठी दरवर्षी चार ते पाचवेळा भीमा नदीतून पाणी सोडले जाते. एकूण 20 टीमएसी पाणी शहरासाठी सोडले जाते. तत्पूर्वी, आकस्मित आरक्षणाची तरतूद करुन सोलापूकरांची तहान भागविण्यासाठी पाणी सोडण्यात येते. दुसरीकडे शहराला दररोज पाणीपुरवठा होईल, एवढे पाणी सोडले जात असतानाही ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना चार-पाच दिवसाआड पाणी दिले जाते. सोलापूर-उजनी या समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर आम्हाला भीमा नदीतून पाणी सोडण्याची काहीच गरज नाही, असा बॉण्ड महापालिकेने पाटबंधारे विभागाला दिला आहे. त्यामुळे नदीतून पाणी सोडताना अपव्यय होणारे पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता विश्‍वनाथ वच्चे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

शहराची सद्यस्थिती 
अंदाजित लोकसंख्या 
11.50 लाख 
दररोजची पाण्याची गरज 
190 एमएलडी 
सध्या मिळणारे पाणी 
150 एमएलडी 
पाण्याची दररोजची गळती 
45 एमएलडी 
शहराचा पाणीपुरवठा 
4-5 दिवसाआड 

सोलापूकरांना दररोज मिळते 45 लिटर कमी पाणी 
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (कायद्यानुसार) नागरिकांना दररोज 135 लिटर पाणी देणे महापालिकेस बंधनकारक आहे, तर शहरात कामानिमित्त काही दिवसांसाठी ये-जा करणाऱ्यांना दररोज सरासरी 35 ते 40 लिटर पाणी द्यावे, असे निकष आहेत. मात्र, सोलापूकरांना दररोज केवळ 80 ते 82 लिटर एवढेच पाणी दिले जाते. तर सोलापुरात काही कामानिमित्त येणाऱ्यांना पाणीच मिळत नाही, अशी स्थिती असल्याचे पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. महापालिकेच्या बगिचा, शाळा, सार्वजनिक नळ आणि गळती यातून दररोज तब्बल 45 एमएलडी पाणी जाते, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com