आमदार संजय शिंदे, पोलिस आयुक्त शिंदे होम क्वारंटाइन; जिल्हाधिकाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाबाधित किती आणि कोरोनामुळे मृत्यू किती याची उत्सुकता असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना अनोखा धक्का बसला. सोलापूर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्हिडिओद्वारे अधिकृतपणे जाहीर केले.

सोलापूर : कोरोनाबाधित किती आणि कोरोनामुळे मृत्यू किती याची उत्सुकता असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना अनोखा धक्का बसला. सोलापूर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्हिडिओद्वारे अधिकृतपणे जाहीर केले. या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेले करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे व सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पोलिस आयुक्त शिंदे व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घरातून कामकाज पाहावे (वर्क फ्रॉम होम) अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिल्या आहेत. 
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरच्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. कोरोनाबाधित असलेले महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांचा संपर्क आला असल्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्हाधिकाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सध्या कोरोनाबाबतची कोणतीही लक्षणे नाहीत. खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यांनी घरातूनच कामकाज पाहावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मी उपस्थित होतो. या बैठकीत त्या अधिकाऱ्याशी माझा संपर्क आला, या संपूर्ण बैठकीदरम्यान मी पूर्णवेळ मास्क वापरला. वारंवार सॅनिटायझरचाही वापर केला. या बैठकीला उपस्थित असलेले महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित असल्याने स्पष्ट झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मला होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मी सध्या होम क्वारंटाइन झालो आहे. पोलिस आयुक्त शिंदे व महापालिकेचे कोरोनाबाधित अधिकारी शनिवारी (ता. 27) बराच वेळ एकामेकांसोबत असल्याचेही आज समोर आले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील व त्या कोरोनाबाधित अधिकाऱ्यांचा फारसा संपर्क आला नसल्याचेही समोर आले आहे. 
पालकमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले, सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य सरकार तत्पर आहे. महापालिकेचे अधिकारी बाधित झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Collector of Work from Home and Police Commissioner and MLA Sanjay Shinde of Home Quarantine