Breaking सोलापुरात कोरोनाने सोमवारी घेतला सात जणांचा बळी; 25 रुग्ण वाढल्याने एकूण बाधित 608 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

23 जणांना घरी सोडले 
कोरोनामुक्त झालेल्या 23 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अद्यापही चाचणीचे 194 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

सोलापूर : सोलापुरात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सोलापूर शहर व जिल्ह्यातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण 58 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज नव्याने 25 रुग्ण आढळले असून सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 608 झाली आहे. 
दमानी नगर परिसरातील 57 वर्षीय महिलेला 22 मे रोजी सकाळी नऊ वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. देगाव नाका परिसरातील गंगानगर येथील 58 वर्षीय महिलेला 22 मे रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सव्वाचारच्या सुमारास त्या महिलेचे निधन झाले आहे. रविवार पेठेतील 60 वर्षीय पुरुषाला 22 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या दिवशी सायंकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले. आंबेडकर नगर परिसरातील 58 वर्षीय पुरूषाला 24 मे रोजी रात्री बाराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री पावणे एकच्या सुमारास त्यांचे निधन झाले. रविवार पेठ परिसरातील 68 वर्षे महिलेला 22 मे रोजी सकाळी 11 वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 24 मे रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले. नीलम नगर परिसरातील 58 वर्षीय पुरुषाला 19 मे रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. 24 मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हिरज परिसरातील 65 वर्षे पुरुषाला 23 मे रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 25 मे रोजी सकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले आहे. 
आज नव्याने आढळलेल्या 25 रुग्णांमध्ये कुमठा नाका येथील एक पुरुष, बुधवार पेठेतील एक महिला, न्यू बुधवार पेठ येथील एक पुरुष, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय क्वॉर्टर येथील दोन पुरुष व एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथील एक पुरुष व दोन महिला, आंबेडकर नगर एक पुरुष, कर्णिक नगर येथील एक पुरुष व एक महिला, दत्तनगर समय युक्त झोपडपट्टी येथील एक पुरुष व एक महिला, शिवगंगा मंदिर मराठा वस्ती परिसरातील दोन पुरुष व एक महिला, मार्कंडेय चौकातील एक महिला, लष्कर येथील एक महिला, अक्कलकोट रोडवरील समाधान नगर येथील एक पुरुष, जुना विडी घरकुल येथील एक महिला, साखर पेठेतील एक महिला, उत्तर कसबा येथील एक महिला, भैय्या चौकातील एक महिला, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हिरज येथील एक पुरुष अशा पंचवीस जणांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur Corona on Monday claimed seven death an increase of 25 patients and a total of 608 affected