आम्हीही  आमच्या `यांना` आणले असते ना.... 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 21 मार्च 2020

जनतेच्या पैशाच्या या उधळपट्टीबाबत कर्तव्यदक्ष आयुक्त गांभीर्याने दखल घेतात की उपमहापौरांनी त्यांच्यावर केलेला आरोप खरा आहे हे दाखवून देतात हे या प्रकरणातून लवकरच दिसणार आहे. 

सोलापूर : महापालिका महिला व बालकल्याण विभागाशी संलग्नित असलेल्या वाहनचालक, शिपायांसह तब्बल 42 जणांनी पुणे ते दिल्ली विमानप्रवासाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे मानधनावरील कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश होता. इतक्‍याजणांना घेऊन जाण्याची गरज होती का, की तरतूद आहे ती खर्ची घालायची म्हणून जाणीवपूर्वक इतक्‍या लोकांना नेण्यात आले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

अभ्यास दौऱ्यासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या 42 पैकी दोन नगरसेविकांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. त्यांच्या जागी पर्यायी नगरसेविकांना नेण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार अभ्यास दौऱ्यासाठी रेल्वेने प्रवास करणे शक्‍य होते, पण केवळ ज्या संस्थेमार्फत हा दौरा आयोजिण्यात आला, त्या संस्थेच्या सोईसाठी ऐनवेळी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकूणच सोलापूरच्या गोरगरीब जनतेने कर रूपाने व रणरणत्या उन्हात कष्ट करीत घाम घाळून कमविलेल्या उत्पन्नातून भरलेला पैसा मनसोक्त उधळण्याचा अधिकारच आपल्याला आहे अशा थाटात सर्वकाही आयोजक कंपनीवर सोपविण्यात आल्याचे दिसून आले.

महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी दिलेल्या यादीनुसार दौऱ्यात सहभागी नगरसेविका : राजश्री कणके, निर्मला तांबे, विजयालक्ष्मी गड्डम, अंबिका पाटील, वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, ज्योती बमगोंडे, मंदाकिनी पवार, सोनाली मुटकिरी, राधिका पोसा, रामेश्‍वरी बिरू, सावित्रा सामल, कुमुद अंकाराम, अमिता मगर, शशिकला बत्तुल, प्रतिभा मुदगल, वहिदाबानो शेख, वैष्णवी करगुळे, फिरदोस पटेल, नूतन गायकवाड, जुगनुबाई आंबेवाले, मंगल पाताळे, अनिता कोंडी, वरलक्ष्मी पुरुड, वहिदाबी शेख, पूनम बनसोडे, सुनीता रोटे, अश्‍विनी चव्हाण, राजश्री बिराजदार, मनीषा हुच्चे व कल्पना कारभारी. याशिवाय सहायक आयुक्त सुनील माने, महिला व बालकल्याण अधिकारी व्ही. आर. कस्तुरे, कनिष्ठ श्रेणी लिपिक एम. ए. नराल, समूह संघटक आर. आर. लोखंडे व पी. ए. कांबळे, संगणक चालक पी. जी. डुरके व एम. सामलेटी, शिपाई एस. आर. शिंदे व ए. पी. शेवाळे आणि वाहनचालक यू. एस. यलशेट्टी. 

या दौऱ्यात समितीतील एका नगरसेविकेचा पतीही सहभागी झाला होता. विशेष म्हणजे त्या पतीचे नाव महापालिकेच्या अधिकृत यादीत आहे. त्यावर सहभागी नगरसेविकांतून नाराजी व्यक्त केली. तिने तिच्या पतीला आणले तर, आम्हीही आमच्या पतीस आणले असतो, अशा प्रतिक्रिया दिल्ली मुक्कामी नगरसेविकांनी दिल्या. त्या पतीच्या नावावरून भाजपच्या काही नगरसेविकांनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली. दौऱ्यात सहभागी झालेल्या एका ज्येष्ठ नगरसेविकेनेच ही माहिती स्वतःहून "सकाळ'ला दिली. दरम्यान, प्रशासकीय यादीत खासगी व्यक्तीचे नाव कसे आले याची विचारणा श्री. कस्तुरे यांना केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corporation women and child comitee news