सोलापूर "डीसीसी' लागली निवडणुकीच्या कामाला 

प्रमोद बोडके
Wednesday, 19 August 2020

दूध संस्थांची संख्या मोठी 
जिल्ह्यातील ज्या 2 हजार 717 संस्थांकडून शेअर्सची रक्कम पूर्ण केली जाणार आहे, त्यामध्ये गाव पातळीवरील सहकारी दूध उत्पादक संस्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, हातमाग व विणकर संस्थांचाही समावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 484, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 74, मोहोळमधील 170, अक्कलकोटमधील 46, पंढरपुरातील 244, माढ्यातील 414, सांगोल्यातील 403, करमाळ्यातील 106, माळशिरसमधील 402, बार्शीतील 261 आणि मंगळवेढा तालुक्‍यातील 113 संस्थांचा समावेश आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा, समाजकारणाचा आणि राजकारणाचा गाभा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे. बॅंकेची निवडणूक कधी होणार, हा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. निवडणूक कधीही होऊ द्या, निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले पात्र मतदार तयार करण्यासाठी जिल्हा बॅंकेची यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यातील तब्बल 2 हजार 717 सभासद संस्थांकडून बॅंकेच्या शेअर्सची रक्कम पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये तत्कालीन चेअरमन राजन पाटील यांच्या नेतृत्वखालील सोलापूर जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. सुरवातीला जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख आणि नंतरच्या काळात सहकार विभागाचे अप्पर निबंधक शैलेश कोथमिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक नियुक्तीचा असलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतरही प्रशासक कोथमिरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

बॅंकेचा आर्थिक गाडा जोपर्यंत सुरळीत होत नाही, तोपर्यंत प्रशासकच कायम राहणार, असे संकेत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यावर बॅंकेची निवडणूक होईल, अशी अपेक्षा असलेल्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. जिल्हा बॅंकेचे सभासदत्व मिळविण्यासाठी पूर्वी पाच हजार रुपयांचे शेअर्स आवश्‍यक होते. गेल्या वर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत शेअर्सची रक्कम दहा हजार रुपये करण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील तब्बल 2 हजार 717 संस्थांकडून शेअर्सची वाढीव रक्कम भरून घेणे आवश्‍यक आहे. ही रक्कम घेतल्यावर मतदानासाठी आवश्‍यक असलेल्या नियमांपैकी एका नियमाची पूर्तता होते. मतदानासाठी आवश्‍यक असलेली पूर्तता करण्यासाठी बॅंकेच्या वतीने मार्चमध्येच जिल्ह्यातील 2 हजार 717 संस्थांना पत्र पाठविण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया मधल्या काळात थंडावली होती. आता बॅंकेचे कामकाज नियमितपणे सुरू झाल्याने ही मोहीम बॅंकेच्या वतीने पुन्हा एकदा हाती घेण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur "DCC" started election work