सोलापूर डीसीसी 1 ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांना देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज 

प्रमोद बोडके
Saturday, 19 September 2020

माळशिरसमध्ये सर्वाधिक पात्र संस्था 
पीक कर्ज वाटपासाठी पात्र ठरलेल्या 334 संस्थांमध्ये माळशिरस तालुक्‍यातील सर्वाधिक 79 संस्थांचा समावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील सात, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पाच, पंढरपूर तालुक्‍यातील 57, सांगोला तालुक्‍यातील 52, बार्शीतील पाच, करमाळ्यातील 38, मोहोळ मधील 25, माढ्यातील 53, अक्कलकोट तालुक्‍यातील तीन व मंगळवेढा तालुक्‍यातील 10 संस्थांचा समावेश आहे. 

सोलापूर : आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे प्रशासक नियुक्त असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने1 ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून ज्या शेतकरी सभासदांनी अल्पमुदत पीक कर्जाची बाकी पूर्णता भरली आहे त्याच सभासदांना पुनश्‍च पीक कर्ज वाटप करण्याचे धोरण बॅंकेने स्वीकारले आहे. या धोरणानुसार 1 ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. 

पीक कर्ज वाटपाच्या नवीन धोरणांतर्गत ज्या प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची 30 जून 2020 अखेर बॅंक पातळीवरील कर्जाची वसुली शंभर टक्के व संस्था पातळीवरील सभासद कर्जाची वसुली 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे अशा संस्था पात्र ठरविण्यात आल्या आहेत. इष्ट तफावतीमध्ये व नफ्यामध्ये असलेल्या सोसायट्यांच्या सभासदांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. नवीन धोरणानुसार जिरायती पिकासाठी अल्पमुदत कमाल कर्ज मर्यादा 25 हजार रुपये, संपूर्ण बागायती क्षेत्रासाठी अल्पमुदत कमाल कर्जाची मर्यादा एक लाख रुपये, जिरायत व बागायत पीक कर्जासाठी एकत्रित कमाल कर्ज मर्यादा एक लाख रुपये इतकी असणार आहे. 

ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने वसूल करतात अशा संस्थेमार्फत प्रायोगिक तत्त्वावर अल्बम मुदती कर्ज वाटपाचे धोरण राबविले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 1 हजार 264 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून त्यापैकी नवीन धोरणानुसार पीक कर्ज वाटपास 334 संस्था पात्र आहेत. उर्वरित संस्थानी बॅंक पातळीवर 100 टक्के वसुली व संस्था पातळीवर 50 टक्के वसुली केल्यास त्याही संस्था नवीन धोरणानुसार पीक कर्ज वाटपास पात्र होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur DCC will provide short term crop loans to farmers from October 1