esakal | सोलापूर जिल्हा कॉंग्रेसच्या  कार्याध्यक्षपदी सुरेश हसापुरे 
sakal

बोलून बातमी शोधा

suresh hasapure

अश्‍पाक बळोरगी व शिवलिंग सुकळे असे दोन जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर ग्रामीण कॉंग्रेसमध्ये कार्यरत होते. सुकळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सोलापूर जिल्हा कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सुरेश हसापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हसापुरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कॉंग्रेसला आणखी ताकद मिळेल असा विश्‍वास आहे. 
- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, सोलापूर कॉंग्रेस 

सोलापूर जिल्हा कॉंग्रेसच्या  कार्याध्यक्षपदी सुरेश हसापुरे 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे यांची निवड झाली आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी नुकतेच हसापुरे यांना निवडीचे पत्र दिले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील निंबर्गी गावचे उपसरपंच म्हणून हसापुरे यांच्या राजकीय कारर्किदीला सुरुवात झाली. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हसापुरे यांना जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदा संधी दिली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या समवेत त्यांनी जिल्हा युवक कॉंग्रेसचे खजिनदार म्हणून काम पाहिले. त्यानंतर युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले. आमदार संजय शिंदे यांच्या सोबत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून हसापुरे यांनी काम पाहिले आहे. 

नूतन जिल्हा कार्याध्यक्ष हसापुरे म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आपण कॉंग्रेसचे काम करणार आहोत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व सर्वांना सोबत घेऊन जाणारा कॉंग्रेस पक्ष आहे. कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी मी सर्वांना विश्‍वासात घेऊन परिश्रम घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

go to top