कृषी पर्यटनातून सोलापूर जिल्ह्याला मिळणार वाव, राज्य सरकारचे धोरण जाहीर; गाव पातळीवर रोजगाराची संधी 

प्रमोद बोडके
Monday, 5 October 2020

अशी असणार निवासाची व्यवस्था 
कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी पर्यटकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कृषी पर्यटन केंद्रासाठी नियमावली निश्‍चित करण्यात आली आहे. दोन एकरासाठी कमाल चार खोल्या आवश्‍यक आहेत. एका खोलीचे आकारमान किमान दीडशे चौरस मीटर किमान असणे आवश्‍यक आहे. दोन ते पाच एकरापर्यंत कमाल सहा खोल्या आवश्‍यक असून किमान दीडशे चौरस मीटरची एक खोली असणे आवश्‍यक आहे. पाच एकरापेक्षा अधिक जास्त क्षेत्रासाठी आठ खोल्या व शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था असलेले दोन लोक निवास (25 गाद्या प्रत्येकी असणे आवश्‍यक आहे) आवश्‍यक आहे. खोलीचे किमान आकारमान दीडशे चौरस मीटर व लोक निवासाचे किमान आकारमान 700 ते 800 चौरस फूट असणे आवश्‍यक आहे. 

सोलापूर : राज्यातील 55 ते 60 टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय यासह शेती संलग्न व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय आणि शहरी पर्यटकांना पर्यटनाचा आनंद देण्यासाठी राज्याचे कृषी पर्यटन धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. डाळिंब, केळी, द्राक्ष व दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या सोलापूर जिल्ह्याला कृषी पर्यटन धोरणातून जिल्ह्याला मोठा वाव मिळणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट यासह शेजारच्या जिल्ह्यातील तुळजापूर व गाणगापूरला जाण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक सोलापूर जिल्ह्यात येतात. या भाविकांना/पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला येत्या काळात मोठी संधी मिळणार आहे. राज्य शासनाने निश्‍चित केलेल्या कृषी पर्यटन धोरणानुसार कृषी पर्यटन केंद्राचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र, खासगी व शासकीय कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदारी संस्था किंवा कंपनी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

कृषी पर्यटन केंद्रामार्फत पर्यटकांना एक दिवसीय सहल, निवासव्यवस्था, मनोरंजनात्मक सेवा (उदा. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, साहसी खेळ, ग्रामीण खेळ), कृषी कॅम्पिंग, फळबागा व पदार्थ विक्री केंद्र इत्यादी व्यवस्था कृषी पर्यटन केंद्रावर असणार आहे. ग्रामीण समाजव्यवस्थेचा अनुभवही या निमित्ताने पर्यटकांना देता येणार आहे. ग्रामीण भागातील बलुतेदार, आलुतेदार, वासुदेव, डोंबारी, बहुरूपी ही परंपरा पर्यटकांना सांगितली जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध घटकातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur district to get scope from agri-tourism, state government's policy announced; Employment opportunities at village level