
राज्य सरकारच्या महसूल विभागाने गुरुवारी राज्यासाठी 2 हजार 192 कोटी 89 लाख रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
सोलापूर : सोलापूरसह महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी झाली. महापूर आला. त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी राज्य सरकारच्या वतीने मदतीचा दुसरा व अंतिम हप्ता जाहीर करण्यात आला आहे. या दुसऱ्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 250 कोटी 71 लाख 82 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.
राज्य सरकारच्या महसूल विभागाने गुरुवारी राज्यासाठी 2 हजार 192 कोटी 89 लाख रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. नुकसानीच्या मदतीचे वाटप करण्यासाठी हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळविले आहे. तरीही ही मदत वाटप करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना महसूल व वन विभागाने त्या - त्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
एसडीआरएफच्या दरानुसार व वाढीव दरानुसार शेती पिकांसाठी हेक्टरी 10 हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी 25 हजार रुपये या प्रमाणे मदत केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीसाठी 503 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली होती. पहिल्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 251 कोटी तर दुसऱ्या हप्त्यात 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याने शेतीच्या नुकसानीसाठी जेवढी मागणी राज्य सरकारकडे केली होती, जवळपास तेवढा निधी सरकारकडून सोलापूर जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल