सांगोला पोलिस ठाणे जिल्ह्यात प्रथम ! वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीची दखल 

Sangola Police
Sangola Police

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात जानेवारी ते डिसेंबर 2020 या वर्षभरात पोलिसांनी दाखल अनेक गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे करून उघडकीस आणल्याबद्दल सांगोला पोलिस स्टेशनला वर्षभरातील कामगिरीबद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. 

सांगोला तालुक्‍याचे क्षेत्रफळ मोठे असून तालुक्‍यात एकच पोलिस स्टेशन आहे. तसेच गुन्ह्याचे प्रमाणही वाढलेले असले तरी उपलब्ध पोलिस कर्मचाऱ्यांच्या बळावर चांगली कामगिरी केली आहे. सांगोला तालुक्‍यात वर्षभरामध्ये 20 गंभीर गुन्हे घडले असून त्यातील 19 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच अवैध वाळू वाहतूक संदर्भात 79, अवैध जुगार संदर्भात 74 तर अवैध दारू व्यवसायासंदर्भात 246 गुन्हे वर्षभरामध्ये दाखल करण्यात आले आहेत. 

जानेवारी ते डिसेंबर 2020 अखेरपर्यंत सांगोला पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरोडा, जबरी चोरी, खून, खुनाचे प्रयत्न, बलात्कार व इतर चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा कसोशीने व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याची उकल सांगोला पोलिस प्रशासनाने केली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली असून, पोलिस प्रशासनाकडून आपल्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले गेले आहेत. 

2020 मध्ये तीन खुनासारखे गंभीर गुन्हे घडलेले असून हे सर्व गुन्हे उघडकीस आलेले आहेत. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यांची निर्गती करण्यात आलेली आहे. तसेच नऊ खुनासारखे प्रयत्न केल्यासारखे गंभीर गुन्हे घडले असून हे नऊ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यामध्ये 27 आरोपी निष्पन्न करण्यात आले असून 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून पाच आरोपी अटकपूर्व जामीनला आहेत. दोन दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे घडले असून सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. या गुन्ह्यात14 आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून दरोड्यातील 2 लाख 68 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. वर्षभरामध्ये सहा जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे घडलेले असून या गुन्ह्यांतील पाच चोऱ्या उघडकीस आणलेल्या आहेत. या उघडकीस आलेल्या चोरीमध्ये आठ आरोपी निष्पन्न करण्यात आलेले असून त्यांनाही अटक करण्यात आले. 23 हजार शंभर रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. 

मोटारसायकल चोरीतील सराईत गुन्हेगार सूर्यकांत गडहिरे याच्याकडून 16 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक संदर्भात 79 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामधील 186 आरोपी निष्पन्न केले आहेत. यामध्ये तीन कोटी 4 लाख 64 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. जुगार संदर्भात 74 केसेस दाखल करण्यात आल्या असून यामध्ये 20 लाख 96 हजार 72 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. अवैध दारू व्यवसायासंदर्भात 246 केसेस केल्या असून 14 लाख 95 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

सांगोला पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विनामस्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुचाकीवर डबलसीट जाणे, निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान चालू ठेवणे असा प्रकार वेळोवेळी दिसल्याने आदेशाप्रमाणे 19 हजार 920 केसेस करून 26 लाख 16 हजार 250 रुपये दंडात्मक कारवाई केलेली आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्या 216 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सांगोला पोलिस ठाणे हद्दीतील काही तक्रारदारानी गंभीर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. या गुन्ह्यांचा सखोल तपास करून त्या खोट्या असल्याचे सप्रमाण अहवाल न्यायालयात सादर केला आहे. पोलिस ठाणे हद्दीत परराज्यातील महिला आणून बेकायदा देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून त्यात लॉज मालकासह इतर स्टाफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना या गुन्ह्यात अटक करून कारवाई करण्यात आलेली आहे. 

सांगोला पोलिस प्रशासनाची ही वर्षभराची कामगिरी लक्षात घेता जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या वर्षभराच्या कामगिरीबद्दल प्रथम क्रमांक मिळाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com