सोलापूरला मिळाले साडेपाच महिन्यानंतर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी 

संतोष सिरसट 
Monday, 7 September 2020

गुरुवारी किंवा शुक्रवारी घेईन पदभार 
सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी सर्वांच्या सहकार्याने काम केले आहे. यापुढेही चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील. गुरुवार किंवा शुक्रवारी सोलापूर येथील शिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेईन. 
भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक. 

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी भास्करराव बाबर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज काढले आहेत. ते सध्या मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहायक संचालक या पदावर कार्यरत होते. माध्यमिक शिक्षण विभागाला जवळपास साडेपाच महिन्यानंतर पदसिद्ध शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. 

माध्यमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील हे 30 मार्चला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्याकडे होता. श्री. पाटील यांच्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांना सक्तीच्या रजेवार जाण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. पण, पाटील यांची सेवानिवृत्ती जवळ आल्यामुळे त्यांनी या तक्रारीकडे पारसे गांभीर्याने पाहिले नाही. श्री. पाटील यांच्यावर दबाव टाकून कार्यभार साध्य करण्याचा प्रयत्नही काही सदस्यांनी केल्याची चर्चा त्यावेळी जिल्हा परिषदेत सुरु होती. माध्यमिक शिक्षण विभाग नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. मात्र, मागील चार-पाच महिन्यांपासून सगळीकडे कोरोनाचा कहर सुरु असल्याने या विभागाबाबत चर्चा झाली नाही. जवळपास साडेपाच महिन्यानंतर पदसिद्ध शिक्षणाधिकारी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्री. बाबर यांनी यापूर्वी माध्यमिक विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी दक्षिण सोलापूर, पंढरपूर या तालुक्‍यात गटशिक्षणाधिकारी म्हणूनही कामकाज पाहिले आहे. काहीकाळ उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur got a secondary education officer after five and a half months