सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

अभय जोशी 
Wednesday, 2 December 2020

पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी या प्रकरणी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मंगळवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटाच्या सुमारास खासदार जयसिध्देश्वर महास्वामी हे द. ह. कवठेकर प्रशालेत आले आणि त्यांनी जिथे मतदान प्रक्रिया सुरु होती. त्या वर्गात थेट प्रवेश केला. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. 

या प्रकरणी भाजप खासदारांना मतदान केंद्रात जाण्यास परवानगी आहे का, असा प्रश्न श्री. मांडवे यांनी विचारला होता. तेव्हा खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या सोबत आलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष बादलसिंह ठाकूर यांनी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे ही आले होते. त्यांच्याकडे परवानगी होती का असा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा मांडवे यांनी श्री. साळुंखे हे मतदान केंद्राच्या आत गेले नव्हते, असे स्पष्टीकरण केले. 

खासदार श्री. महास्वामी यांनी श्री. मांडवे यांच्याशी बोलताना, इथे प्रचार नसतो. फक्त शांततेत मतदान सुरु आहे का, कोविडच्या धर्तीवर नियमांचे पालन होत आहे, का हे पाहण्यासाठी आपण आलो होतो, असे सांगितले होते. त्यानंतर खासदार महास्वामी यांच्याकडे कोणतीही परवानगी नसताना त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केल्याचे लक्षात आल्यावर श्री. मांडवे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी मोबाईल वरुन संपर्क साधून तक्रार केली होती. प्रांताधिकारी श्री. ढोले यांनी केंद्राध्यक्षाकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी याविषयी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन खासदार श्री. महास्वामी यांच्या विरोधात आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक श्री. गाडेकर तपास करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur MP Jayasiddheshwar Mahaswami charged with breach of code of conduct