अरेच्चा ! सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसचे ऑनलाइन बुकिंग हाउसफुल्ल 

तात्या लांडगे
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

  • ऑनलाइन बुकिंग सुरुच असून काउंटर तिकीट सेवा आहे बंद 
  • लॉकडाउननंतर टप्प्याटप्प्याने सुरू होणार रेल्वे वाहतूक 
  • गावाकडे अडकलेल्यांना लागली मुलांबाळांची ओढ : गावी परत जाण्यासाठी वाढले बुकिंग 
  • 14 एप्रिलनंतर रेल्वे वाहतूक सुरु होण्याची लागली आशा 

सोलापूर : कोरोनाचा लॉकडाउन 14 एप्रिलनंतर संपणार आहे, परंतु प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरू होणार नाही. टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक सुरू केली जाणार असून ज्या गाड्या सुरू होणार आहेत, त्या गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. सोलापुरातून मुंबईला जाणाऱ्या सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसचे ऑनलाइन बुकिंग हाउसफुल्ल झाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. 

हेही नक्‍की वाचा : अबब...! कारागृहाची क्षमता 141 अन्‌ आहेत 428 कैदी 

कोरोनाचे वैश्‍विक संकट देशातून हद्दपार करण्याच्या हेतूने 22 मार्चपासून देशातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. आता 14 एप्रिलनंतर काही मार्गांवरील प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने सुरू केले आहे. दरम्यान, लॉकडाउननंतर काउंटर तिकीट बुकिंग व तिकीट काढणे बंद करण्यात आले असून त्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. तत्पूर्वी, सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस, इंटरसिटी एक्‍स्प्रेस, उद्यान एक्‍स्प्रेस यासह सोलापूर विभागातून धावणाऱ्या बहुतांश गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही काही मार्गांवरील रेल्वे वाहतूक बंदच राहिल्यास संबंधित प्रवाशांना तिकिटाचा 100 टक्‍के परतावा दिला जाईल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

हेही नक्‍की वाचा : मालवाहतूक वाहनांना स्वतंत्र परवान्याची गरज नाही 

ऑनलाइन बुकिंग सुरुच आहे 
कोरोनाचे लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत असून त्यानंतर काही मार्गांवरील रेल्वे वाहतूक सुरू होईल. ऑनलाइन बुकिंगला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसचे बुकिंग आतापर्यंत हाउसफुल्ल झाले आहे. दरम्यान, लॉकडाउननंतर कोणत्या मार्गांवरील गाड्या सुरू करायच्या, याबाबत वरिष्ठ स्तरावरून लवकरच निर्णय होईल. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 

हेही नक्‍की वाचा : सोलापूर ते नेलमंगलादरम्यान रो- रो सेवेला मान्यता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Mumbai Siddheshwar Express Online Booking HouseFull