ब्रेकिंग! चालकांअभावी महापालिकेची परिवहन बससेवा थांबली; चालक न येण्याचे 'हे' आहे कारण

तात्या लांडगे
Wednesday, 2 September 2020

परिवहनकडील चालकांची स्थिती
कायमस्वरुपी चालक
81
बदली चालक
32
कंत्राटी चालक
75
सतत गैरहजर
94
दररोज लागणारे चालक
42
सध्या उपलब्ध चालक
23

सोलापूर : ई-पासची अट बंद केल्यानंतर शहरातील प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. खासगी वाहतूक पूर्ववत झाली असून जनजीवनही सुरळीत झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या परिवहन विभागाने "हात दाखवा व बस थांबवा' ही मोहीम सुरू करण्याचे नियोजन केले. मात्र, आता चालकांअभावी सध्या सुरू असलेल्या परिवहनसेवेला अडथळा निर्माण झाला आहे. कायम, बदली व कंत्राटी अशा एकूण 188 चालकांपैकी तब्बल 98 चालक कामावरच येत नसल्याने दुपारनंतर परिवहनसेवा बंद ठेवावी लागत आहे.

 

सद्यस्थितीत महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात 30 बस आहेत. त्यापैकी 13 बस कोरोनाच्या कामासाठी दिल्या आहेत. तर सध्या शहरातील विविध मार्गांवर व ग्रामीणमधील पाच मार्गांवर 11 बस सुरू असून त्यासाठी दररोज 40 ते 42 चालकांची गरज आहे. महापालिकेच्या परिवहन विभागात 81 चालक कायमस्वरुपी असून त्यातील 17 चालक कायमस्वरुपी गैरहजर आहेत. तर 38 चालक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आणि 12 ते 14 चालक नगरअभियंता, महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या वाहनांवर आहेत. काहीजण रजेवर, साप्ताहिक सुट्टीवर असतात. दुसरीकडे कंत्राटी चालक खासगी वाहनांवर कामास जात असातनाही वेतन वेळेवर मिळत नसल्याने महापालिकेच्या बसवर येत नाहीत. बदली चालकही वेतनाअभावी कामावर येत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता लॉकडाउनमध्ये अडकून पडलेली परिवहन सेवा चालकांअभावी थांबल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

परिवहनकडील चालकांची स्थिती
कायमस्वरुपी चालक
81
बदली चालक
32
कंत्राटी चालक
75
सतत गैरहजर
94
दररोज लागणारे चालक
42
सध्या उपलब्ध चालक
23

टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई
महापालिकेची परिवहन सेवा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, यादृष्टीने परिवहन समितीचे सभापती जय साळुंखे यांनी नियोजन केले आहे. परिवहनचे नूतन व्यवस्थापक तथा सहाय्यक आयुक्‍त राम पवार यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांना परिवहन विभागाने पत्र दिले. अवैधरित्या टप्पा वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर आरटीओकडून 15 दिवसांत 30 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण व शहरातील बससेवा सुरू करुन प्रवाशांमध्ये विश्‍वास निर्माण करण्याकरिता परिवहनकडे पुरेशा बस उपलब्ध नाहीत. परिवहन विभागाकडे प्रवासी वाहतुकीसाठी अवघ्या 17 बस उपलब्ध असून त्यालाही चालकांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमीच असल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुढील आठवड्यात मोहोळ-सोलापूर सेवा
परजिल्ह्यातून शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या आता वाढू लागली आहे. तर ग्रामीण भागातून शहरात विविध वस्तू खरेदीसाठी तथा काही कामानिमित्ताने येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या परिवहन विभागाने कासेगाव, मुस्ती, संगदरी, देवकुरळी आणि मंद्रूप-विंचूर अशी सेवा सुरू केली आहे. आता पुढील आठवड्यात मोहोळ-सोलापूर-मोहोळ अशी सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर बंद बस दुरुस्तीसाठी महापालिकेकडे सुमारे 30 ते 50 लाखांचा निधी मागितला आहे. परंतु, त्यावर अद्याप आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी निर्णय घेतलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur Municipal bus service stopped due to lack of drivers