ब्रेकिंग ! महापालिका आयुक्‍तांचे आदेश; मास्क घाला अन्यथा पाचशे रुपयांचा दंड

तात्या लांडगे
Thursday, 19 November 2020

ठळक बाबी... 

  • अनलॉकमध्ये वाढतेय शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी
  • विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्यांची संख्या लक्षणीय
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; मास्क घालणे बंधनकारक
  • विनामास्क असलेल्यांना आता शंभर नव्हे तर पाचशे रुपयांचा दंड
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वॉच आणि कारवाईसाठी शंभर कर्मचारी

सोलापूर : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आता दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता सर्वच व्यवहार पूर्ववत केले आहेत. त्यामुळे अनलॉक काळात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. दुकानात तथा दुकानांसमोर गर्दी वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. दुसरीकडे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही लक्षणीय दिसू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी विनामास्क फिरणाऱ्यांना शंभर रुपयांऐवजी पाचशे रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

 

ठळक बाबी... 

  • अनलॉकमध्ये वाढतेय शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी
  • विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्यांची संख्या लक्षणीय
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; मास्क घालणे बंधनकारक
  • विनामास्क असलेल्यांना आता शंभर नव्हे तर पाचशे रुपयांचा दंड
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वॉच आणि कारवाईसाठी शंभर कर्मचारी

 

नोव्हेंबरमध्ये शहरातील 13 हजार 951 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात 395 पॉझिटिव्ह आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ते 50 वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असून मृतांमध्ये 60 वर्षांवरील को- मॉर्बिड रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. कामानिमित्त किंवा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यातच अनेकजण विनामास्क शहरात संचार करु लागले आहेत. त्यामुळे आता महापालिका आयुक्‍तांनी मास्क न घालणाऱ्यांचा दंड वाढविण्याचा निर्णय घेतला. शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल दररोज महापालिकेस सादर करण्याचे आदेश आयुक्‍तांनी सफाई अधिक्षकांना दिले आहेत. नवीपेठ, दत्त चौक, माणिक चौक, टिळक चौक, सराफ बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, साखर पेठ, न्यू पाच्छा पेठ, विजयपूर रोड, होटगी रोडवरील बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत.

 

प्रभावी अंबलबजावणी नाहीच 
शहरातील नवी पेठेसह अन्य बाजारपेठांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महापालिकेने सफाई अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त नागरिकांवर कारवाईसाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे. त्यांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रभावीपणे कारवाईची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे विनामास्क वावरणाऱ्यांसह सोशल डिस्टन्सिंचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur Municipal Commissioner's new orders! Wear a mask otherwise a fine of five hundred rupees