महापालिकेतील लिपिकांना येईना टायपिंग ! आयुक्‍तांच्या आदेशानुसार नोव्हेंबरमध्ये शेवटची संधी 

तात्या लांडगे
Wednesday, 14 October 2020

सराव करा अन्यथा वेतनवाढ थांबणार 
महापालिकेतील 50 वर्षाखालील 218 लिपिकांची ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यात सुमारे 60 टक्के लिपिक अनुत्तीर्ण झाले. त्यानंतर आयुक्‍तांनी त्यांना एक महिन्याची मुदत दिली. तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आता त्यांची परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचे आदेश आयुक्‍तांनी काढले. परीक्षेपूर्वी महापालिकेतील 563 लिपिकांनी संगणक व टायपिंग शिकून घ्यावे. अन्यथा त्यांची वेतनवाढ रोखली जाणार आहे. तर काहींची पदोन्नती रद्द करण्याचा इशाराही आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.

सोलापूर : महापालिकेत एकूण 563 लिपिक असून त्यांच्या वेतनापोटी दरमहा सुमारे अडीच ते तीन कोटींचा खर्च होतो. लिपिकांना पदोन्नती देऊनही त्यांना संगणकावरील टायपिंग व संगणक चालवता येत नाही. आयुक्त पी. शिवशंकर यांनी एक महिन्याची डेडलाईन देऊनही परिस्थिती "जैसे थे' च आहे. त्यामुळे आता या लिपिकांची नोव्हेंबरमध्ये टंकलेखन व संगणकीय परीक्षा घेतली जाणार आहे. त्यांच्यासाठी दिलेली ही शेवटची संधी असेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार लिपिक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या टायपिंगचा वेग 30 तर इंग्रजी टायपिंगचा वेग 40 असणे आवश्‍यक आहे. तर त्यांच्याकडे "एमएस-सीआयटी' तथा शासनमान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तर दुसरीकडे त्यांना प्रत्यक्षात काम करता येणेही आवश्‍यक आहे. मात्र, सद्यस्थितीत लिपिक पदावर काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना प्रशासकीय काम करताना संगणकच चालवता येत नसल्याचे उघड झाले आहे. तर अनेकांना संगणकावर टायपिंग करता येत नसून ते अन्य कर्मचाऱ्यांकडून आपली कामे करुन घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. लिपिक संवर्गातील कनिष्ठ श्रेणी लिपिक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ मुख्य लेखनिक व कार्यालयीन अधीक्षकांना मराठी तथा इंग्रजी टायपिंग येत नाही. याबाबत अनेक विभागांमधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची ऑगस्ट महिन्यात ऑफलाइन पद्धतीने टंकलेखनाची परीक्षा घेतली. त्यामध्ये बहुतांश कर्मचारी नापास झाले. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार असून टायपिंग व संगणक अशा दोन्ही परीक्षा त्यांना द्याव्या लागणार आहेत.

सराव करा अन्यथा वेतनवाढ थांबणार 
महापालिकेतील 50 वर्षाखालील 218 लिपिकांची ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यात सुमारे 60 टक्के लिपिक अनुत्तीर्ण झाले. त्यानंतर आयुक्‍तांनी त्यांना एक महिन्याची मुदत दिली. तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आता त्यांची परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचे आदेश आयुक्‍तांनी काढले. परीक्षेपूर्वी महापालिकेतील 563 लिपिकांनी संगणक व टायपिंग शिकून घ्यावे. अन्यथा त्यांची वेतनवाढ रोखली जाणार आहे. तर काहींची पदोन्नती रद्द करण्याचा इशाराही आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur municipal corporation The clerks will give the typing and computer test in November