महापालिकेचे नवे आदेश ! कराची येणेबाकी भरल्याशिवाय कर्मचाऱ्यांना पगार नाहीच

तात्या लांडगे
Wednesday, 18 November 2020

आदेशातील ठळक बाबी...

  • महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील मालमत्तेचा कर भरावा
  • निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कराची येणेबाकी भरल्यानंतरच मिळणार निवृत्ती वेतन
  • नोव्हेंबरचे वेतन बिल देताना संबंधित कर्मचाऱ्यांनी येणेबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक
  • महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित कर भरणा होत नसल्याने काढले नवे आदेश

सोलापूर : महापालिकेतील कर्मचारी व शहरातील आठ विभागीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील येणेबाकी भरल्याशिवाय पगार मिळणार नाही, असे आदेश उपायुक्‍त जमीर लेंगरेकर यांनी काढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता नगरसेवकांनीही त्यांच्या तथा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील कराची येणेबाकी भरल्याविना त्यांचे मासिक मानधन देऊ नये, अशी मागणी होऊ लागली आहे.

आदेशातील ठळक बाबी...

  • महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील मालमत्तेचा कर भरावा
  • निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कराची येणेबाकी भरल्यानंतरच मिळणार निवृत्ती वेतन
  • नोव्हेंबरचे वेतन बिल देताना संबंधित कर्मचाऱ्यांनी येणेबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक
  • महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित कर भरणा होत नसल्याने काढले नवे आदेश

 

महापालिकेच्या कर संकलन विभागांतर्गत आठ विभागीय कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत शहर व हद्दवाढ भागातील मिळकती तथा जमिनीवर कर आकारणी केली जाते. त्या मिळकत कराची वसुली या विभागीय कार्यालयांमार्फत होते. कर संकलन विभाग हा महापालिकेत स्थायी उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मिळकत कर वसूल होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तथा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावावरील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेली कराची रक्‍कम भरावी. त्यांनी कराची संपूर्ण रक्‍कम भरुन 2020- 21 मधील येणेबाकी नसल्याचा दाखला घ्यावा. तो दाखला तथा प्रमाणपत्र पगार बिलासोबत जोडावा, असे आदेश महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडील करभरणा झाल्याची खातरजमा करावी. त्यानंतरच त्यांना येणेबाकी नसल्याचा दाखला द्यावा, असेही आदेशात नमूद केले आहे. तो दाखला नोव्हेंबर 2020 च्या वेतन बिलासोबत जोडणे बंधनकारक असले, असेही उपायुक्‍त लेंगरेकर यांनी स्पष्ट केले आहे. येणेबाकी नसल्याची खात्री झाल्याशिवाय नोव्हेंबरचे वेतन बिल अदा करु नये, अशी सक्‍त ताकद देण्यात आली आहे. हा नियम निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही लागू राहील, असे उपायुक्‍त लेंगरेकर यांनी आदेशात नमूद केल आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur Municipal Corporation New orders! There is no salary without paying the tax arrears