... तर सोलापुरात होणार त्वरीत `शटर डाऊन`

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 1 जून 2020

तीन आसनी वाहनांबाबत संदिग्धता
मिशन पुनःप्रारंभ दोनअंतर्गत आवश्यक बाबींसाठी टॅक्सी, रिक्षा, चारचाकी वाहनांना चालक व दोन प्रवासी असे तर केवळ चालकच या अटीवर दोन चाकी वाहनांना परवानगी असेल असे म्हटले आहे. या आदेशासोबतच जोडलेल्या परिशिष्टामध्ये तीन चाकी वाहनांचा उल्लेखच नाही. त्यामुळे तीन चाकी वाहनांना परवानगी आहे की नाही याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. 

सोलापूर : लॅाकडाऊन शिथिलतेच्या कालावधीत दुकानदारांसाठी कॅशलेस सुविधा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचवेळी दुकानासमोर सोशल डिस्टन्स ठेवण्याची जबाबदारी संबंधितांवर असून, कॅशलेस सुविधा नसल्यास आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसले की प्रशासनाकडून तातडीने संबंधित परिसरातील दुकाने, बाजारपेठ बंद केली जाणार आहे.

मध्यरात्री झाला आदेश जारी
सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी लॅाकडाऊनच्या कालावधीतील नियोजनाचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी काल मध्यरात्री उशीरा जारी केले. त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. शहरातील दुकाने आणि बाजारपेठा 5 जूनपासून उघडणार आहेत. तत्पुर्वी संबंधितांनी या सुविधा करून घ्यावात असे प्रशासनाकडून सुचविण्यात आले आहे. 

जबाबदारी दुकानदारांवर
दुकानात येणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतरचे निकष पाळण्यासाठी दुकानदार जबाबदार असणार आहेत. त्यासाठी त्यांनी जमिनीवर खुणा करणे, टोकन पद्धती, घरपोच सेवा इत्यादी सेवेला प्राधान्य देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सर्व व्यवहार कॅशलेस करणे बंधनकारक असणार आहे. कॅशलेस व्यवहार होत नसल्याचे आढळल्यास संबंधित दुकान आणि बाजारपेठ त्वरीत बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

खरेदीसाठी पायी जाण्याचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही खरेदीसाठी पायी जाण्यास प्राधान्य द्यावे. ते शक्य नसेल तर सायकलीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्वयंचलित वाहनांचा वापर कटाक्षाने टाळण्याचे सुतोवाच या आदेशात करण्यात आले आहे. अनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासास कसल्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur municipal corporation publish name of tax defaulter on digital board