esakal | खबरदार...! नाल्यात कचरा टाकाल तर......
sakal

बोलून बातमी शोधा

खबरदार...! नाल्यात कचरा टाकाल तर......

नाल्यात कचरा टाकण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची प्रत मिळाली आहे. त्यानुसार विभागीय कार्यालयानुसार पथक नियुक्त करण्यात येतील. जे नागरिक नाल्यात कचरा टाकताना आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. 
- संजय जोगदनकर, मुख्य सफाई अधीक्षक, सोलापूर महापालिका

खबरदार...! नाल्यात कचरा टाकाल तर......

sakal_logo
By
विजयकुमार सोनवणे

 
सोलापूर  :  राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रांत घंटागाड्यांची व्यवस्था असतानाही अनेक नागरिक त्यांच्या घरातील कचरा नाल्यात टाकतात. कचरा टाकल्यामुळे नाले तुंबतात. त्यामुळे अशा नागरिकांना शोधून त्यांना आर्थिक दंड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्याचे प्रबोधनही केले जाणार आहे. एप्रिलअखेर या संदर्भातील कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना दिल्या आहेत. 

हेही वाचा - या महापालिकेत पहिल्या दिवशीचे लेट लतिफ 

"हीरक महोत्सवी महाराष्ट्र-नागरी स्वच्छता अभियान'
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त हरित शहरांच्या निर्मितीसाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत 1 मार्चपासून 30 एप्रिल 2020 पर्यंत "हीरक महोत्सवी महाराष्ट्र-नागरी स्वच्छता अभियान' राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे शंभर टक्के संकलन करणे, घनकचऱ्याच्या विलगीकरणाचे प्रमाण वाढवणे, विलगीकृत घनकचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करणे, रस्त्यांची सुधारणा व सौंदर्यीकरण करणे, फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करणे, शहरातील नाल्यांची सफाई करणे, सर्वसाधारण स्वच्छता करणे, संबंधित शहरांशी समान वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन तयार करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. 

सफाई "फ्लॉप शो' ठरते
पावसाळ्याचे वेध लागले, की शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरवात होते. वास्तविक वेळोवेळी स्वच्छ करावेत, अशी या नाल्यांची स्थिती असते. मात्र, पावसाळ्यापूर्वीच सफाईचे काम होते. एखादा मोठा पाऊस झाला, की नाल्याची सफाई किती गांभीर्याने केली जाते, याचे उत्तरच मिळते. त्यामुळे अशी सफाई "फ्लॉप शो' ठरते, हा आजवरचा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कार्यवाही झाल्यास नागरिकही नाल्यात कचरा टाकण्यास धजावणार नाही. फक्त या संदर्भातील कारवाई ही धडाकेबाज पद्धतीने राबविण्याची गरज आहे. 

नाल्यात काय आढळते 
प्लास्टिक, झाडांची पाने, फांद्या आदी नाल्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण करतात. हे केवळ पावसाळ्यापूर्वीच नव्हे तर सातत्याने काढण्याची गरज आहे. एखादा मोठा पाऊस झाला की पुन्हा गाळ, दगड, कचरा, टाकाऊ कपडे, झाडाच्या फांद्या, काचा, लोखंडाचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या, कापड, नारळाच्या करवंट्यांनी नाले भरून जातात. पोर्टर चाळीजवळ नालेसफाई करताना तलवारी आणि वायरचे बंडल आढळल होते. नाल्यातून काढलेला कचरा हा नाल्याच्या कडेलाच ठेवला जातो. तो वेळेवर उचलला जात नाही. पाऊस पडला, की हा सर्व कचरा पुन्हा नाल्यात पडतो व पुन्हा अडथळा निर्माण होतो. 

go to top