सुरक्षा साहित्याअभावी अग्निशमन यंत्रणाच "रामभरोसे' ! साहित्य खरेदीचा प्रस्ताव महापालिका सभेपुढे 

Fire Brigade.
Fire Brigade.

सोलापूर : आगीपासून मनुष्य व वित्तहानी रोखण्यासाठी 24 तास कार्यरत असलेली महापालिकेची अग्निशमन यंत्रणा गत अनेक वर्षांपासून सुरक्षा साहित्याअभावी आपला जीव धोक्‍यात घालून काम करत आहे. पण आता उशिरा का होईना अग्निशमन जवानांना लवकरच सुरक्षा साहित्य मिळणार आहेत. 

अग्निशमन ही आपत्कालीन सेवा मानली जाते. आगीशिवाय अन्य आपत्तीवेळी देखील ही यंत्रणा लोकांच्या मदतीला धावून जाते. महापालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या 37 जवान आहेत पण त्यांना कुठलीही सुरक्षा नाही. त्यामुळे अग्निशमनाचे काम करताना त्यांना स्वतःचा जीव धोक्‍यात घालूनच काम करावे लागते. सध्या अग्निशमन दलाकडे केवळ तीन ब्रीदिंग ऑपरेटर सेट आहेत. आग विझवताना जवानांना धुरामुळे ऑक्‍सिजनची कमतरता भासून त्यांचा जीव गुदमरू नये व पर्यायाने त्यांचा जीव वाचावा याकरिता हे सेट उपयोगी पडते. अग्निशमन जवानांची संख्या 37 तर या सेटची संख्या केवळ तीन आहे, यावरून अग्निशमन दलाची यंत्रणा किती तोकडी आहे, हे स्पष्ट होते. 

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने विकास कामांसाठी नेहमीच निधीची कमतरता भासते, हे सर्वश्रुत आहे. अग्निशमनसारख्या आपत्ती यंत्रणेलाही निधीची तरतूद होत नाही, हे भीषण वास्तव आहे. म्हणून अग्निशमन दलाला रामभरोसेच काम करावे लागते, असा आजवरचा अनुभव आहे. या जवानांना पुरेसे सुरक्षा साहित्य नसल्याने यंत्रणेच्या मर्यादा लक्षात येतात. आपत्ती निवारणाचे काम सक्षमपणे करण्यासाठी या जवानांना सुरक्षा साहित्यांची अत्यंत गरज असताना महापालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे याकडे असलेली डोळेझाक हे खूप काही सांगून जाते. यावरून आपत्कालीन यंत्रणासंदर्भातील त्यांची अवस्थाही यानिमित्ताने अधोरेखित होते. 

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन दलाला येत्या काळात तरी चांगले दिवस येणार असे दिसते. याचे कारण म्हणजे, या दलासाठी आवश्‍यक सुरक्षा साहित्य घेण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. महापालिकेकडे निधीची कमतरता असल्याने जिल्हा वार्षिक योजनेतून सुरक्षा साहित्य, पाइप, पिचकारी आदी साहित्य खरेदीचा सुमारे 99 लाखांचा प्रस्ताव शनिवारी होणाऱ्या महापालिका सभा पटलावर ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास सुरक्षा साहित्य खरेदीचा मार्ग मोकळा होणार आहे; तसेच या दलाची यंत्रणा सक्षम होण्यास मदत होणार आहे. 

जवानांना लवकरच मिळणार फायर एंट्री सूट 
देशात अग्निशमन जवानांसाठी गत चार वर्षांपूर्वी फायर एंट्री सूट हे सुरक्षेचे नवीन साधन आले आहे. या सूटमुळे जवानांचा आगीपासून बचाव होण्यास मदत होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर येथील जवानांना हे सुरक्षा साहित्य काही वर्षांपूर्वी उपलब्ध झाले आहे. पण उशिरा का होईना सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनाही फायर सूट तसेच ब्रीदिंग ऑपरेटर सेट मिळणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका सभेपुढे ठेवण्यात आला आहे. 

अग्निशमन दलाच्या सक्षमीकरण व बळकटीकरणाचा प्रयत्न 
महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी "सकाळ'शी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हा वार्षिक योजनेच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण योजनेंतर्गत महापालिका अग्निशमन दलासाठी सुरक्षा व अन्य साहित्य खरेदीचा सुमारे 99 लाखांचा प्रस्ताव शनिवारी होणाऱ्या महापालिका सभेपुढे ठेवण्यात आला आहे. यामध्ये फायर एंट्री सूट, ब्रीदिंग ऑपरेटर सेट, पाइप, पिचकारी यांचा समावेश आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com