सोलापूर राष्ट्रवादी युवकला मिळणार नवीन अध्यक्ष, इच्छुकांच्या उद्या मुलाखती 

प्रमोद बोडके
Saturday, 10 October 2020

हे आहेत इच्छुक 
करमाळ्यातील प्रताप जगताप व अभिषेक आव्हाड, पंढरपूर तालुक्‍यातील विकास शिंदे, संदीप मांडवे, गणेश पाटील, अरुण आसबे यांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज सादर केलेला आहे. उद्या या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन युवकचे प्रदेशाध्यक्ष शेख याबाबचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतर साधारत: आठवड्यात सोलापूर जिल्ह्याला नवीन युवक जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत माने यांच्या ठिकाणी नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने तयारी केली आहे. सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदासाठी या अगोदर अर्ज केलेल्या इच्छुकांच्या मुलाखती उद्या (रविवार, ता. 11) दुपारी दोन वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात होणार आहेत. 

इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवकचे जिल्हा प्रभारी शरद लाड हे उद्या (रविवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उस्मानाबादची आढावा बैठक संपून दुपारी दोन वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात येणार आहेत. जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदासाठी यापूर्वीच अर्ज सादर केलेल्या इच्छुकांच्या ते मुलाखती घेणार आहेत. यासोबतच पक्ष पातळीवर आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावाही ते घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी दिली. 

अनपेक्षितपणे सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आकर्षण आता सर्व समाज घटकातून वाढू लागले आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ज्येष्ठ मंडळी इतर पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देखील बदलत आहे. नवीन अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur NCP youth will get new president, interviews of aspirants tomorrow