इंटरसिटी, इंद्रायणी अन्‌ सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस 15 सप्टेंबरनंतर धावण्याची शक्‍यता; म्हैसूर-सोलापूर सेवा सुरू

तात्या लांडगे 
Saturday, 12 September 2020

अनलॉक चारनंतर शासनाने शिथिलता दिल्याने मुंबई, पुण्यातील बहुतांश कंपन्या, शासकीय व खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे साहजिकच सोलापुरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची ओढ प्रवाशांना लागली आहे. रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या; मात्र त्या गाड्यांची वेळ व कामाच्या वेळेत मोठा फरक पडला होता. इंटरसिटी, इंद्रायणी व सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस गाड्या सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा रेल्वे प्रवासी संघटनांसह प्रवाशांना आहे. 

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेला लॉकडाउन अद्यापही पूर्णपणे उठलेला नाही. आता टप्प्याटप्प्यात अनलॉक होत असून, आजपासून (शनिवार) म्हैसूर-सोलापूर आणि बंगळूर-नवी दिल्ली यासह 40 रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. दरम्यान इंटरसिटी, इंद्रायणी व सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस या रेल्वेगाड्या 15 सप्टेंबरनंतर सुरू व्हाव्यात, यासाठी रेल्वे मंत्रालयासमवेत चर्चा सुरू असल्याची माहिती सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोना काळात संसर्ग वाढू नये म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. अनलॉक चारनंतर शासनाने शिथिलता दिल्याने मुंबई, पुण्यातील बहुतांश कंपन्या, शासकीय व खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे साहजिकच सोलापुरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची ओढ प्रवाशांना लागली आहे. रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या; मात्र त्या गाड्यांची वेळ व कामाच्या वेळेत मोठा फरक पडला होता. इंटरसिटी, इंद्रायणी व सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस गाड्या सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा रेल्वे प्रवासी संघटनांसह प्रवाशांना आहे. दरम्यान, लॉकडाउन काळात रेल्वे प्रवाशांच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजना, करण्यात आलेली विविध कामे, दुहेरीकरण, विद्युतीकरण, श्रमिक ट्रेन, माल वाहतूक, किसान रेल, रो-रो सेवा यासह विविध उपक्रमांविषयी माहिती या वेळी गुप्ता यांनी दिली. ऑनलाइन पत्रकार परिषदेस अतिरिक्‍त विभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे आदी उपस्थित होते. 

लॉकडाउनमध्ये रेल्वेचा वाढला तोटा 
लॉकडाउनच्या 72 दिवसांत रेल्वेला दररोज तब्बल अकराशे कोटींचा फटका बसला आहे. दुसरीकडे, रेल्वेच्या 14 लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी दरमहा सुमारे नऊशे कोटींची पदरमोड करावी लागत आहे. आता टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू असून शनिवारी विविध मार्गांवरील 40 रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. 30 सप्टेंबरनंतर रेल्वे वाहतूक सुरू होण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. मात्र, रेल्वेचा तोटा पाहता संपूर्ण अनलॉकनंतर खासगी रेल्वेगाड्या वाढण्याचीही शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur to Pune Intercity and Siddheshwar Express will run again