उजनी जलाशयाचे पाणी झाले स्वच्छ व नितळ

राजाराम माने
Friday, 2 October 2020

एरवी कायम प्रदूषणामुळे चर्चेत असणारे उजनीचे पाणी या वर्षी मात्र प्रदूषणविरहित झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील व राज्यातील लॉकडाउन वाढत गेले. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व्यावसायिकांना जोरदार फटका बसला असला तरी सोलापुर-पुणे अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयाचे प्रदुषण मात्र काही वर्षापेक्षा यावर्षी मात्र अल्प प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. उजनी जलाशयाच्या प्रदूषणाचे प्रमाण अल्प झाल्याने कधी नव्हे ते प्रथमच उजनी जलाशयाचे पाणी नितळ झाल्याचे दिसत आहे. एरवी कायम प्रदूषणामुळे चर्चेत असणारे उजनीचे पाणी या वर्षी मात्र प्रदूषणविरहित झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

मार्च ते जून हे तीन महिने संपूर्ण लॉकडॉऊनमुळे रस्त्यावरील गर्दी अतिशय अल्प होती. म्हणून वाहनामुळे होणारे प्रदूषण थांबले आणि वातावरण स्वच्छ झाले. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड कमी झाल्याने तापमानातही घट झाली, त्यामुळे यावर्षी उच्चांकी तापमान गेलेच नाही.
   
एरवी पावसाळा सुरू झाला की पुणे, पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील औद्योगिक क्षेत्रातून जलाशयात येणारे रासायनिक तसेच दूषित पदार्थ, रासायनिक पाणी व शहरी भागातील मलमूत्र तसेच रासायनिक पदार्थ याद्वारे येणारे प्रदूषित पाणी उजनीत दाखल होते व उजनीच्या प्रदूषणाची पातळी खालावते. सध्या उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असूनही गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेले ओद्योगिक क्षेत्र यास कारणीभूत असल्याचे प्रमुख कारण आहे.

उजनी जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरात पोहण्यास जाणारे तरुणही यावर्षी पाणी स्वच्छ असल्याचे सांगत आहेत. नाहीतर दरवर्षी पाण्यात उतरल्या बरोबर या पाण्याच्या दुर्गंधीबरोबरच अंगाची खाज होत असे, त्यामुळे परिसरातील कोणीही जलाशयात पोहण्यात जात नसत.

ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक डॉ.अरविंद कुंभार म्हणाले, कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लागू केलेले लाॅकडाऊन हे उपाययोजना उजनी जलाशयाला उपयोगीच पडली. लाॅकडाऊनमुळे जलाशय परिसरात मानवी वावर व त्याचे हस्तक्षेप यावर निर्बंध आले. त्यामुळे जलाशय दूषित होण्यापासून वाचवले. याचा जलाशय परिसरात मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांसह इतर जैवविविधतेला लाभ झाला. 
 
कुंभेजचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंखे म्हणाले, जलाशयाच्या प्रदूषणास जबाबदार असणार्‍या संबंधित घटकावर कारवाई झाल्यास उजनी निश्चितच यापुढे मोकळा श्वास घेईल असे वाटते. 

केतूरचे राहुल इरावडे म्हणाले, राजकीय आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी पाणी प्रदूषण करणाऱ्या अनेक घटकावर कारवाई होत नाही. त्यामुळे उजनी प्रदूषणात वरचेवर वाढ होत आहे. त्यात हेच पाणी थेट पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो.
           
विकास काळे म्हणाले, उजनीच्या वाढणाऱ्या प्रदूषण मुक्तीसाठी काही स्वयंसेवी संस्था विविध स्तरावर प्रयत्न करतात. परंतु त्यांना म्हणावा असा प्रतिसादच मिळत नाही, ही मात्र दुर्दैव आहे.
          
अॅड.अजित विघ्ने म्हणाले, यापुढे उजनीच्या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्वच घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. 
          
अक्षय आखाडे म्हणाले, कोरोनाच्या अनुषंगाने कमी झालेले प्रदूषण ही उजनीचे पाणी स्वच्छ राहण्यास कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.      

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Pune The water of Ujani reservoir which is the boon of Ahmednagar district has become clean