esakal | सोलापूरचा पारा 44.2 अंश सेल्सिअस वर
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूरचा पारा 44.2 अंश सेल्सिअस वर

उन्हाचा चटका वाढल्यानंतर पाऊस हजेरी लावत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव असल्याने येत्या तीन-चार दिवसात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोलापूरचा पारा 44.2 अंश सेल्सिअस वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद आज सोलापूर शहर व परिसरात झाली. सोलापूरच्या तापमानाचा पारा आज 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला असून उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात उन्हाचा चटका अधिक प्रखर झाला आहे.

मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे सोलापूर शहर व परिसराच्या तापमानात कमालीची घट झाली होतीगेल्या दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ झाली. शुक्रवारी दिवसभर व रात्री, आज  दिवसभर उष्ण झळा, उन्हाचा चटका, उकाडा प्रखरतेने जाणवत होता. सोलापुरात शेवटच्या टप्प्यात उन्हाळा कठीण जाऊ लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्यानंतर पाऊस हजेरी लावत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव असल्याने येत्या तीन-चार दिवसात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रोहिणी नक्षत्राला रविवारपासून प्रारंभ
यंदाच्या हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोक हैराण झाले. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या नक्षत्राला (रोहिणी) उद्यापासून (रविवार) प्रारंभ होत आहे. उद्या रात्री अडीचच्या सुमारास सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश होत आहे. यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्राला 7 जून पासून सुरुवात होत आहे. या मृग नक्षत्राचे वाहन म्हैस असून म्हैस वाहन असल्यास पाऊस दमदार हजेरी लावत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. रोहिणी व मृग नक्षत्र नक्षत्रात झालेल्या पावसाचा मोठा फायदा खरिपाच्या पिकासाठी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दोन नक्षत्र महत्वाची मानली जातात. गेल्या दोन-तीन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील खरीप उत्पादक शेतकऱ्यांची निराशा होत आहे. जूनच्या सुरुवातीच्या काळात पाऊस दांडी मारत असल्याने खरिपाचे पीक शेतकऱ्यांना गमवावे लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात अडीच ते तीन लाख हेक्‍टरवर खरीपाची पिके घेतली जातात. अवकाळी, लॉक डाऊन यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपामधून आर्थिक उत्पन्नाची अपेक्षा आहे. खरिपाच्या पिकावरच शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असल्याने यंदाच्या खरिपाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

go to top