esakal | सोलापुरातील तरुणाची "डोक्‍यालिटी', सोशल मीडियाच्या मदतीने लॉकडाउनमध्ये टिकविला व्यवसाय 
sakal

बोलून बातमी शोधा

social media

लॉकडाउनमुळे अनेकांचा खिसा रिकामा होऊ लागला आहे. ग्राहकांना माफक दरात चांगल्या गुणवत्तेचे मांसाहारी पदार्थ घरपोच देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमच्याकडील मसाले, मटन, चिकन चांगल्या दर्जाचे असल्याने इतरांच्या तुलनेत त्याची चव नक्कीच वेगळी लागते. ग्राहकांसाठी काही आकर्षक व सवलतीच्या योजनाही आम्ही आणत आहोत. 
- नरसिंग खडके, के. के. रोस्टिंग हाउस, सोलापूर 

सोलापुरातील तरुणाची "डोक्‍यालिटी', सोशल मीडियाच्या मदतीने लॉकडाउनमध्ये टिकविला व्यवसाय 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना बाहेर फिरू देईना आणि रोजगार, घरचा खर्च घरात बसू देईना अशीच काहीशी स्थिती लॉकडाउन कालावधीत अनेकांची झाली. चांगले चांगले व्यवसाय लॉकडाउन कालावधीत डबघाईला आले. सोलापुरातील नरसिंग खडके या उच्चशिक्षित युवकाने फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत मित्रांची साथ मिळवत आपला व्यवसाय टिकविला आहे. या युवकाने दाखविलेल्या कल्पकतेमुळे त्याचा व्यवसाय तर टिकलाच, परंतु त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना रोजगारही मिळाला, घरबसल्या खवय्यांना चमचमीत पदार्थ मिळाले. 

बोकडाच्या मटनापासून बनविली जाणारी शिक आणि कढई ही सोलापुरी फेमस डिश. सोलापुरात मिळणारी शिक कढई देशभरात प्रसिद्ध आहे. नरसिंग खडके यांच्या परिवाराचा 50 वर्षांपासून शिक कढई बनविण्याचा व्यवसाय आहे. नरसिंग याने स्वत: के. के. रोस्टिंग हाउसच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाउन कालावधीत सरकारने पार्सल आणि होम डिलिव्हरी सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर के. के. रोस्टिंग हाउसच्या माध्यमातून खवय्यांना शिक कढई, खिमा उंडे (बॉल), मटन बिर्याणी, चिकन कढई, चिकन बटर, चिकन ड्राय यासह इतर मांसाहारी पदार्थ खवय्यांना घरपोच देण्यात येऊ लागले. 

खवय्यांसाठी बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची माहिती फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपच्या पोस्टद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून खवय्यांपर्यंत पोचविण्यात आली. नरसिंग खडके याच्या मित्रांनी या पोस्ट (पदार्थांची माहिती देणाऱ्या) स्वत:च्या फेसबुकवरून व व्हॉट्‌सऍपवरून शेअर केल्या. या पोस्टवर दिलेल्या संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून खवय्यांना घरबसल्या या पदार्थांची टेस्ट घेता आली.

घरपोच सेवा देणाऱ्या अनेक नामांकित कंपन्या जास्तीचे कमिशन आकारू लागल्याने के. के. रोस्टिंग हाउसच्यावतीने स्वत:ची होम डिलिव्हरी सेवा तयार करण्यात आली. के. के. रोस्टिंग हाउसपासून सात ते आठ किलोमीटर परिसरात मोफत घरपोच सेवा देण्यात आली. अवघ्या एक ते दीड तासात मनपसंत मांसाहारी पदार्थ घरपोच मिळू लागल्याने लॉकडाउन कालावधीत के. के. रोस्टिंग हाउसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे खडके यांनी सांगितले.