सोलापूर जिल्हा परिषद राबविणार "माझे गाव, कोरोनामुक्त गाव' अभियान 

प्रमोद बोडके
Tuesday, 1 December 2020

खासगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या मार्फत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी. तपासणी होत नसेल तर खासगी डॉक्‍टरांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा. दर सोमवारी आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पातळीवर आढावा घ्यावा. जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून आरोग्य सेवा देणे बंधनकारक आहे. यापुढे कामचुकार अधिकारी व कर्मचारीवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. 
- दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 

सोलापूर : कोरोनाबद्दल सर्व साधारण जन जागरण, कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे, ग्रामीण यंत्रणा सक्रीय करून सक्षम बनविणे आणि स्वच्छता व निर्जतूकीकरण मोहीम राबविणे या पंचसुत्रीवर अधारित असलेली "माझे गाव, कोरोनामुक्‍त गाव' अभियान सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणार आहे. 

हे अभियान लोकाभिमुख होण्यासाठी गाव पातळीवर गावातील शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन/ सदस्य यांच्या उपास्थितीत प्रभात फेरी, आरोग्य शिक्षण व प्रतिज्ञा देणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र येथील समर्पण हॉलमध्ये झाली. या बैठकीला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. 

कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आढावा आणि कोविड 19 लसीकरण, आरोग्यवर्धिनी केंद्रातील सेवा मातांची सुरक्षित प्रस्तुती याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी प्रामुख्याने आढावा घेतला. अभियानाच्या अनुषंगाने सामुहिक शपथ डॉ. विलास सरवदे यांनी दिली. बैठकीला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. सोनिया बागडे, डॉ. अनिरुध्द पिंपळे, डॉ. शिवाजी थोरात, डॉ. मोहन शेगर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय शेगर, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Zilla Parishad will implement "My Village, Coronamukta Village" campaign