कोजागिरीला सोलापूरकर पिणार एक लाख लिटर दूध 

प्रकाश सनपूरकर
Thursday, 29 October 2020

सोलापुरात कोजागिरी म्हणजे तुळजापूर पदयात्रा हे समीकरण बनले आहे. हजारोच्या संख्येने या मार्गावर परिसरातील भाविक तुळजापुरच्या दिशेने पदयात्रेने रवाना होतात. या मार्गावर देखील दुधाची विक्री खूप अधिक प्रमाणात होत असते. भाविक वाटेत थांबून चहा व दुध घेतात. यावर्षी ही पदयात्रा होणार नाही. त्यामुळे घरगुती कार्यक्रमासाठी होणारी दुधाची मागणी पुरवठ्यासाठी दुध उत्पादक संस्था, व्यापारी व उत्पादकांचा प्रयत्न आहे. 

सोलापूर ः कोजागिरी पोर्णिमेच्या सणावर यावर्षी कोरोनाचे सावट व तुळजापुर पदयात्रा रद्द झाली असली, तरी देखील दुधाची मागणी एक लाख लिटरने वाढण्याचा अंदाज आहे. कोजागिरी पोर्णिमेनिमित्त दरवर्षी शहरात मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. या वर्षी कोजागिरीचा सण शुक्रवारी (ता.30) रोजी साजरा होत आहे. 

कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी हा सण साजरा करण्यासाठी काही मर्यादा आल्या आहेत. सामुहिक स्वरुपात कोजागिरीचा सण साजरा केला जाणार नाही. मात्र, घरोघरी कुटुंबामध्ये हा सण साजरा होणार आहे. सामुहिक कार्यक्रमाअभावी दुधाच्या मागणीवर काहीसा परिणाम होईल. सोलापुरात कोजागिरी म्हणजे तुळजापूर पदयात्रा हे समीकरण बनले आहे. हजारोच्या संख्येने या मार्गावर परिसरातील भाविक तुळजापुरच्या दिशेने पदयात्रेने रवाना होतात. या मार्गावर देखील दुधाची विक्री खूप अधिक प्रमाणात होत असते. भाविक वाटेत थांबून चहा व दुध घेतात. यावर्षी ही पदयात्रा होणार नाही. त्यामुळे घरगुती कार्यक्रमासाठी होणारी दुधाची मागणी पुरवठ्यासाठी दुध उत्पादक संस्था, व्यापारी व उत्पादकांचा प्रयत्न आहे. 

बाजारातील अनेक दूध उत्पादक संस्थांकडून जादा दूध पुरवठा केला जाणार आहे. दररोज शहरामध्ये दूध उत्पादक संस्थाकडून होणाऱ्या दूध पुरवठ्यामध्ये तीस टक्के मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. हा आकडा देखील साठ हजार लिटरपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. तसेच शहरामध्ये शंभरपेक्षा अधिक खासगी डेअरीचालक देखील दूधपुरवठा करतात. त्यांच्याकडून वीस हजार लिटर जादा दुधाची मागणी बाजारात आहे. परिसरातील खेड्यातून देखील दूध उत्पादक जादा दुधाची विक्री करतात. हा दूधपुरवठा करताना जादा साठा करून कोजागिरीच्या दिवशी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

चौकट 

  • उत्पादक संस्थाकडून 60 ते 70 हजार लिटर जादा दुधाचा पुरवठा 
  •  
  •  खासगी दूध व्यापाऱ्यांकडून 30 ते 40 हजार लिटर जादा दूध उपलब्ध होणार 
  •  एकूण 1 लाख लिटर जादा दुधाची मागणी 

जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक सतीश मुळे यांनी सांगितले की, आम्ही कोजागिरीसाठी जादा दुधाची उपलब्धता बाजारात करून देत आहोत. सर्व केंद्रावर त्या दिवशी दूध उपलब्ध होईल असा प्रयत्न राहणार आहे. 

सोलापूर दूध व्यापारी संघोचे उपाध्यक्ष संतोष शहाणे यांनी सांगितले की, शहरात कोरोनाचे सावट असले तरी कोजागिरीला दुधाची मागणी अधिक असते. ही मागणी पुरवण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध करून तो दिला जाईल. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapurkar will drink one lakh liters of milk to Kojagiri