सोलापूरकर रोज मोजताहेत फक्त कोरोनाचे आकडे 

प्रमोद बोडके
Thursday, 28 May 2020

राज्यकर्त्यांनी सोलापूर सोडले वाऱ्यावर? 
महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी एका जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यानेच देऊन राज्याच्या राजकारणात इतिहास घडविला आहे. आज तोच सोलापूर जिल्हा राजकीय नेतृत्वा अभावी पोरका झाल्याचे दिसत आहे. हाताबाहेर चाललेले सोलापूर सावरण्यासाठी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस सरकार ठोस प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे सोलापूरकरांना कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे प्रभारी पद सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोरोना संकटाच्या काळात सोलापूरकरांच्या मदतीला धावून येणार का? याची उत्सुकता लागली आहे. 

 

सोलापूर : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात व प्रशासकीय सेवेत सोलापूर जिल्हा कायमस्वरूपी अग्रेसर राहिला आहे. सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला देशाला अनेक पॅटर्न दिलेत आहेत. सोलापूर जिल्हा आज कोरोनाच्या लढाईत हतबल झालेला दिसत आहे. सोलापुरातील कोरोना संपणार कधी? याचे ठोस उत्तर ना लोकप्रतिनिधींकडे आहे, ना प्रशासनाकडे आहे. सोलापुरात वाढणाऱ्या कोरोनाबाधीत व्यक्तींची संख्या मोजणे आणि आज किती झाले एवढेच पाहणे सर्वसामान्य सोलापूरकरांच्या हातात राहिले आहे. 
सोलापूरात कोरोना तसा उशिराच पोहोचला. 12 एप्रिल रोजी पहिला रुग्ण सोलापुरात आढळला. सोलापुरात मृत्यू पावलेला व्यक्ती हा कोरोना बाधित असल्याचे त्याच्या मृत्यूनंतर समजले. तेव्हापासूनच सोलापुरात कोरोना काहीतरी अजब घडविणार याची चाहूल लागली होती. महापालिका, पोलीस आयुक्तालय, आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये असलेला विसंवाद आज सोलापूरकरांच्या नशिबी आला आहे. त्याचा परिणाम अवघ्या 45 दिवसांमध्ये सोलापूर शहर हतबल झाले आहे. 45 दिवसांमध्ये सोलापुरातील 66 व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. सोलापुरात कोरोना आटोक्‍यात येणार कधी? याबद्दल फक्त चर्चा आणि अपेक्षा एवढी शिल्लक आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय यासह इतर ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी रुग्णांची होणारी गैरसोय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोलापूरची लक्तरे यातून निघत आहेत. कोरोना बाधित व संशयित रुग्णांची होणारी हेळसांड सोशल मीडियाच्या माध्यमातून आज समोर येऊ लागली आहे. कोरोना संशयित म्हणून जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेले अनेक लोक क्वारंटाइन सेंटरवर गेल्यानंतर पॉझिटिव्ह येत असल्याचा संशय सोलापूरकरांच्या मनात घर करू लागला आहे. या प्रश्नाचे उत्तर ना सर्वसामान्यांना मिळाले, ना संशयित रुग्णांना मिळाले. आज सोलापुरातील तीन व्यक्तींचा कोरोना मुळे मृत्यू झाला. सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तींच्या आकडेवारी सोबत मृत्यूची टक्केवारी काढल्यास ही टक्केवारी 9.89 टक्के एवढी येत आहे. हाताबाहेर गेलेली मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक (मालेगावसह ) यांच्या तुलनेत जास्त आहे. 

प्रलंबित राहिलेल्या 538 रिपोर्टकडे लक्ष 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना चाचणीचे तब्बल 538 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिपोर्ट शिल्लक कसे? याबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला आहे. या रिपोर्टमधून आणखीन किती बाधित समोर येणार? किती जणांचा मृत्यू होणार? या प्रश्नांनी सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील जनतेच्या मनात काहूर माजविले आहे. 

मृत्यू झाल्यानंतर आढळतात कोरोना बाधित 

सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक रुग्ण असे आहेत ज्यांचा अगोदर मृत्यू होतो आणि त्यानंतर ते कोरोना बाधित असल्याचे समोर येते. अशा घटना वारंवार घडू लागल्याने आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये नेमके काय सुरू आहे ? याबद्दल कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना घरी सोडल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे समजताच त्यांना पुन्हा ताब्यात घेतल्याच्याही घटना सोलापूर जिल्ह्यात घडल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapurkars count only corona numbers daily