सोलापूरकरांची कर्मचारी नेते र..ग. कर्णिकांच्या कार्याला सलामी 

r g karnik new1.jpg
r g karnik new1.jpg

सोलापूर ः राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे नेते र. ग. कर्णिक यांच्या कार्याची दखल सोलापूरकरांनी त्यांचे नाव आशियातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण सोसायटीला देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या धोरणात्मक नेतृत्वाचा सन्मान करण्याचे आगळे वेगळे काम केले आहे. सोलापूरकरांचे नाते र. ग. कर्णिक यांच्याशी घट्टपणे जोडले गेले. 
महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटना राज्यातील प्रशासनात एका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी संघटना आहे. या संघटनेने केलेले कार्य पाहता त्यामध्ये र. ग. कर्णिक यांचा वाटा मोलाचा आहे. ते या संघटनेचे सुरुवातीला सेक्रेटरी होते व नंतर त्यांनी अध्यक्षपद भूषवले. अनेक अत्यंत धोरणात्मक अशा प्रकारची निर्णय या संघटनेच्या माध्यमातून घेतले गेले. त्या निर्णयासाठी र. ग. कर्णिक यांचे मोलाचे योगदान होते. पूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा राज्य कर्मचाऱ्यांना लागू होत नव्हता. बहुतांशवेळा आंदोलन केल्याशिवाय राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळत नव्हता. यावरून 1978 मध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने तब्बल 54 दिवसांचा संप केला होता. त्यानंतर र. ग. कर्णिक यांनी यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न प्राधान्याने मांडला. केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सारखा असावा हे धोरण कायमचे अमलात आले. यामध्ये कर्णिक यांची भूमिका महत्त्वाची होती. 
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जीआयएस म्हणजे ग्रुप इन्शुरन्स स्कीम ही एक विशेष योजना अंमलात आणली गेली. राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाच्या श्रेणीनुसार दरमहा वेतनातून या योजनेसाठी रक्कम कपात होते. या माध्यमातून एक मोठा फंड उभा राहिला. राज्याच्या रोजगार हमी योजनेसारख्या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये सुरूवातीला हा फंड दिला गेला. रोहयो योजनेची गरज संपल्यानंतर या फंडाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी कर्ज देण्याचे धोरण राबवण्यासाठी र. ग. कर्णिक यांनी पुढाकार घेतला. कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी या फंडातून कर्जाची उपलब्धता केली गेली. या कर्जासाठी अत्यंत कमी व्याजदर आकारले गेले. तसेच कर्जाची रक्कम वेतनश्रेणीशी जोडून कर्ज फेड संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती कालावधीपर्यंत होईल, अशा पध्दतीने नियोजन केले गेले. कमी व्याजदर व हप्त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे स्वतःचे घर बांधणे सुसह्य झाले. त्याचा लाभ हजारो राज्य कर्मचाऱ्यांना झाला. या धोरणात्मक कामगिरीतून र. ग. कर्णिक यांच्या कार्याची ओळख होते. 
या योजनेचा पहिला प्रयोग सोलापुरातील कर्मचाऱ्यासाठी केला गेला. 711 सभासदांची गृहनिर्माण सोसायटी जी की, आशिया खंडात सर्वात मोठी सोसायटी ठरली. 
सोलापूरमध्ये या योजनेतून कर्मचाऱ्यांची वसाहत बांधण्याचे काम हाती घेतले गेले. तेव्हा येथील गृहनिर्माण सोसायटीचे तत्कालिन अध्यक्ष एम. सी. शेख, शंकर जाधव, सुशिला साळुंखे आदींनी वसाहतीला र. ग. कर्णिक यांचे नाव देण्याचे ठरवले. ही बाब र. ग. कर्णिक यांना कळाली तेव्हा त्यांनी नाव देऊ नये, असा आग्रह केला. पण त्यांचे नाव वसाहतीला देऊन त्यांच्या कार्याची पावती दिली. सोलापूरकरांनी एका अर्थाने र. ग. कर्णिक यांचे नाव वसाहतीच्या माध्यमातून जपले. 

कर्मचाऱ्यांची काळजी घेणारा नेता
र. ग. कर्णिक हे तळागाळातील कर्मचाऱ्यांची काळजी घेणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. कर्मचारी संघटनाच्या कार्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 
- प्रा. अशोक काजळे, चेअरमन, र. ग. कर्णिक गृहनिर्माण संस्था, सोलापूर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com