सोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी ! प्रतिदिन प्रतिमाणसी मिळणार 135 लिटर पाणी

Water Supply
Water Supply

सोलापूर : पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीची जुनी पाइपलाइन, सातत्याने होणारी गळती, नदीद्वारे मिळणारे अपुरे पाणी आणि हिप्परगा तलावासंबंधित अडचणींमुळे सोलापूरकरांना पावसाळा असो की उन्हाळ्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागला. मात्र, आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 110 एमएलडीची नवी पाइपलाइन टाकली जात आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर 1 जानेवारी 2022 पासून सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणार आहे. प्रतिमाणसी 135 लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

सद्य:स्थितीत जुन्या पाइपलाइनमधून 80 एमएलडी, नदीद्वारे 108 एमएलडी आणि हिप्परगा तलावातून 27 एमएलडी पाणी सोलापूरकरांना मिळते. मात्र, नदी व तलावातील पाण्याचे बाष्पीभवन आणि जुन्या पाइपलाइनला लागलेल्या गळतीमुळे प्रत्यक्षात 158 एमएलडीच पाणी सोलापूरकरांना मिळत आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमुळे सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आता संपणार आहे. सोरेगाव ते उजनी पाइपलाइनसाठी लागणाऱ्या जमिनीचा सर्व्हे पूर्ण झाला असून, ले-आउटही तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे, टेंभुर्णी येथील तिढाही आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकारातून सुटला आहे. त्यामुळे भूसंपादनाची कार्यवाही आता सुरू केली जाणार असून, 15 महिन्यांत हे काम संपविले जाईल, असा विश्‍वास स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला.

तत्कालीन आयुक्‍त तावरेंकडून दिरंगाई
सोरेगाव ते उजनीपर्यंत 110 किलोमीटर पाइपलाइनसाठी साडेपाच महिन्यांत भूसंपादन करणे अपेक्षित होते. त्यानंतर भूसंपादनाच्या अनुषंगाने सर्व्हे, ले-आउट करण्यासाठी साडेसहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली. मात्र, एक वर्ष होऊनही तत्कालीन आयुक्‍त दीपक तावरे यांच्या कार्यकाळात काहीच काम झाले नाही. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सर्व्हे करून ले-आउट तयार करावा लागला. त्यामुळे 30 महिन्यांच्या मुदतीत पाइपलाइनचे काम करणे आवश्‍यक आहे. दरम्यान, भूसंपादनास विलंब झाल्याने आता अवघ्या 15 महिन्यांत पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याचे नियोजन स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे.

विद्यापीठ, पोलिस प्रशिक्षण केंद्र व डाळिंब संशोधन केंद्राकडून मिळाली "एनओसी'
सोलापूरकरांना वर्षानुवर्षे भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आता कायमचा मिटणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून 110 एमएलडीची नवी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. सोरेगाव ते पाकणीदरम्यान पाटबंधारे विभागाचा कॅनॉल असून त्यांच्याकडून अद्याप ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले नाही. दुसरीकडे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डाळिंब संशोधन केंद्र आणि पोलिस प्रशिक्षण केंद्राकडून पाइपलाइनच्या कामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे 15 किलोमीटरपर्यंत सध्या काम सुरू झाले आहे.

पाइपलाइनची स्थिती

  • एकूण अंतर : 110 किलोमीटर
  • पाइपलाइनचा अपेक्षित खर्च : 450 कोटी
  • नव्याने मिळणारे पाणी : 110 एमएलडी
  • प्रतिमाणसी मिळणारे पाणी : 135 लिटर
  • भूसंपादनाची रक्‍कम : 35 कोटी
  • काम पूर्ण होण्याचा कालावधी : 31 डिसेंबर 2021

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com