सोलापूरची प्रति"मातोश्री' आता ठाकरेंपासून दुरावली ! 

logo
logo

सोलापूर : काळाचा महिमा अगाध असतो. पदे येतात आणि जातात. वेळ कायमस्वरूपी स्मरणात राहात असल्याचा प्रत्यय सध्या सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना घेत आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या सगळ्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे तत्कालीन मंत्री व सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्याच हातात होती. सोलापूर जिल्ह्यातील कोणालाही थेट "मातोश्री'वर एंट्री नव्हती. त्यांना वाकाव (ता. माढा, संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांचे गाव) मार्गेच मुंबईतील मातोश्रीवर जावे लागत होते. 

सोलापूर जिल्ह्यातील प्रति"मातोश्री' म्हणूनही त्या काळात त्यांची ओळख निर्माण झाली होती. आज बरोबर एक वर्षानंतर ऑक्‍टोबरमध्ये सोलापुरातील शिवसेनेचे आणि संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांचे चित्र बदलले आहे. सोलापूरचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत हे शिवसेनेपासून दुरावले आहेत. सावंत यांच्या येण्यामुळे शिवसेनेचे जे पदाधिकारी दुरावले होते तेच पदाधिकारी आज मातोश्रीच्या जवळ आहेत, हे विशेष. सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री दिलीप सोपल, रश्‍मी बागल, माजी आमदार दिलीप माने यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा शिवसेना प्रवेश असो, की माढ्यातील राष्ट्रवादीचे सहा टर्मचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीतील इतर दिग्गज नेत्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा असो, या सर्व प्रक्रियेत संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची उमेदवारी निश्‍चित करण्यापासून ते अनेकांचा उमेदवारीतील पत्ता कट करण्यापर्यंतचा विषय संपर्कप्रमुख म्हणून तानाजी सावंत यांनी त्यावेळी हाताळला. 

राज्यात अस्तित्वात आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तानाजी सावंत यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले आणि तेव्हापासूनच ते शिवसेनेपासून दुरावत गेले. मंत्रिपदाची संधी हुकल्यापासून मागील संपूर्ण वर्षात संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची एकही बैठक घेतली नाही. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना सध्या काय करते? याचा साधा आढावाही त्यांनी घेतला नाही. नेते आहेत, कार्यकर्ते आहेत पण नेतृत्व नाही अशा स्थितीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिवसेना सध्या सैरभैर झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागा लढविल्या. सांगोला मतदारसंघातून शहाजीबापू पाटील हे एकमेव उमेदवार आमदारकीची परीक्षा काठावर पास झाले. संधी असतानाही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच उमेदवारांचा दारूण पराभव झाला. या पराभवाला विरोधक म्हणून भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस जेवढे जबाबदार आहेत तेवढीच जबाबदार शिवसेनेतील गटबाजी आहे. शिवसेनेतील या गटबाजीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. 

बंडखोरी करणारे आणि धनुष्यबाणावर विधानसभा लढणारे दोघेही आज शिवसेनेतच आहेत. राज्यातील सर्वोच्च पद शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याने शिवसेनेला या सत्तेचा सर्वाधिक फायदा होईल असे वाटत होते. परंतु स्थानिक पातळीवर स्थिती मात्र वेगळी आहे. राज्यात सत्तेत असलेली शिवसेना जिल्हा आणि तालुका पातळीवर मात्र अद्यापही विरोधकांच्या स्टाईलमध्ये वावरताना दिसत आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना सत्तेचा फील येईल अशा काहीच घटना-घडामोडी घडत नसल्याने शिवसेनेला मरगळ आली आहे. महापूर व अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात सोलापूर आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. या दोन्ही दौऱ्यात सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख व परांड्याचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे गैरहजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com