ट्रॅक्‍टरचालकाच्या मुलाने बापाच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचं चीज केलं ! बापाच्या कष्टाची प्रेरणा घेत मुलगा झाला जॉईंट कमिशनर 

अक्षय गुंड 
Friday, 1 January 2021

स्वप्नील पाटील यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. शेतीशिवाय उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. परंतु सतत पडत असलेल्या दुष्काळ व पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतीदेखील बेभरवशाची झाली होती. त्यामुळे स्वप्नील पाटील यांचे वडील शरदराव पाटील हे स्वतः ट्रॅक्‍टर चालक असल्याने कारखान्यावर ऊस वाहतूक करत असत. आपली मुले शिक्षणात हुशार असल्याने त्यांना शिक्षणाची कोणतीही कमतरता भासू द्यायची नाही, अशी वडिलांची प्रबळ इच्छा. त्यामुळे ते रात्रंदिवस काबाडकष्ट करत असत. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : कठोर मेहनत, परिश्रम आणि संघर्ष यामुळे एखादा माणूस जीवनात प्रचंड यश मिळवू शकतो. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या दिग्गज व्यक्तींची आपण उदाहरणे देत असतो. अगदी सामान्य असलेल्या व्यक्ती आयुष्यात असे काही करून दाखवतात, की त्यांची दखल संपूर्ण जग घेते. माणसाच्या आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि तो माणूस आमूलाग्र बदलतो. ध्यास, धडपड, सातत्य, प्रामाणिकपणा, कौशल्य, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर विराजमान होतो. असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक येथील स्वप्नील शरदराव पाटील हे होय.

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे एकेकाळी नोकरी स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नसतानादेखील जिद्द व चिकाटीने व धाडसाने स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला व पहिल्या प्रयत्नातच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. या सामान्य कुटुंबातील युवकाला आज आयकर विभागात जॉईंट कमिशनर म्हणून बढती मिळाली आहे. 

स्वप्नील पाटील यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. शेतीशिवाय उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. परंतु सतत पडत असलेल्या दुष्काळ व पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतीदेखील बेभरवशाची झाली होती. त्यामुळे स्वप्नील पाटील यांचे वडील शरदराव पाटील हे स्वतः ट्रॅक्‍टर चालक असल्याने कारखान्यावर ऊस वाहतूक करत असत. आपली मुले शिक्षणात हुशार असल्याने त्यांना शिक्षणाची कोणतीही कमतरता भासू द्यायची नाही, अशी वडिलांची प्रबळ इच्छा. त्यामुळे ते रात्रंदिवस काबाडकष्ट करत असत. 

स्वप्नील पाटील यांचे प्राथमिक शिक्षण उपळाईच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण माळशिरस तालुक्‍यातील महाळुंग या मामाच्या गावी झाले. अकरावी- बारावीचे शिक्षण दयानंद कॉलेज, सोलापूर येथे झाले. घरच्या परिस्थितीमुळे कमी कालावधीत शिक्षण घेऊन तातडीने नोकरी स्वीकारण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर अपार कष्ट व मेहनत घेत अभियांत्रिकीचे शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पूर्ण केले. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना विविध कंपन्यांतून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. या कालावधीत त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेचा कोणताही विचार नव्हता. कारणही तसे आहे, की त्यांच्यासह दोन बहिणींच्या शिक्षणाचा खर्च व कुटुंबाचा आर्थिक गोष्टीचा सर्व ताण वडिलांवर असल्याने स्वप्नील पाटील हे कंपनीच्या नोकरीसाठी सकारात्मक होते. 

वडिलांच्या कष्टाची जाणीव त्यांना होती. त्यामुळे वडिलांना आपल्या शिक्षणाचा अजून भार द्यायला नको म्हणून ते काही दिवसात कंपनीत नोकरीसाठी रुजू होतील असे असतानाच अचानक गावातील अधिकारी झालेले व सध्या मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. संदीप भाजीभाकरे व स्वप्नील पाटील यांची भेट झाली. अभियांत्रिकीची शैक्षणिक गुणवत्ता बघून डॉ. संदीप भाजीभाकरे म्हणाले, की "तू स्पर्धा परीक्षा कर. तुझ्यात तेवढी क्षमता आहे. तू प्रशासकीय अधिकारी होऊ शकतोस, याची मला खात्री आहे' असे प्रोत्साहन दिले. प्रथमत: स्वप्नील यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास नकार दिला. कारण की आणखी एक वर्ष अभ्यास करण्यात जाणार म्हणजे वडिलांवर आर्थिक खर्चाचा बोजा देखील वाढणार होता. त्यामुळे ते स्पर्धा परीक्षेसाठी उत्साही नव्हते. परंतु डॉ. भाजीभाकरे यांनी दाखवलेल्या स्वप्नामुळे त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वप्नील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला व पहिल्या प्रयत्नातच त्यांची 2011 साली आयआरएसपदी निवड झाली. या काळात वडिलांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागले होते. स्वप्नील पाटील यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा गगनात मावेनासा असा आनंदोत्सव झाला होता. 

पुढे प्रशिक्षणकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रथम गुजरात व नंतर लातूर, पिंपरी- चिंचवड येथे सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांची पुण्याच्या आयकर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. या कालावधीत सामाजिक बांधिलकीतून ते उपळाई बुद्रूक परिसरातील शाळांच्या भौतिक सुधारणासाठी दीड वर्षात सीएसआर फंडातून दीड कोटीच्या आसपास निधी खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक व स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होऊन देखील त्यांनी गावाची नाळ तोडली नाही. गावातील प्रत्येक सामाजिक कामात ते सतत अग्रेसर असतात. प्रशासकीय कार्य देखील ते अत्यंत चोखपणे बजावत असतात. त्यामुळे त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याची दखल घेऊन आयकर विभागाने नुकतीच त्यांना बढती देऊन आयकर उपायुक्त या पदावरून जॉईंट कमिशनर या पदावर नियुक्ती केली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा जिद्द व चिकाटीच्या जोरावर अपार कष्ट मेहनत घेत आज आयकर विभागात आपली कारकीर्द गाजवत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The son of a tractor driver became a joint commissioner in the income tax department