
कोरोनामुळे कलाकार अडचणीत
ऑर्केस्ट्रा, बॅंड पथके आदींमधून काम करणारे कलाकार कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. कोरोनाविरोधात घरातच थांबण्याचा पर्याय हा बचावाचा मार्ग असल्यामुळे सद्य:स्थितीत विविध यात्रा, लग्न समारंभ असे कार्यक्रम रद्द झालेले आहेत. पुढील काही महिनेही असे कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता धूसर झाली आहे. परिणामी, आर्थिक समीकरणे बिघडलेली असतानाही मिले सूर मेरा तुम्हारा ऑर्केस्ट्रातील कलाकार नागरिकांच्या मनोरंजनासाठी देत असलेले विनामूल्य योगदान विशेष उल्लेखनीय ठरू लागले आहे.
करमाळा (जि. सोलापूर) : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असतानाच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक घरातच थांबून आहेत. गेल्या आठवडाभरापासून हीच स्थिती कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील संदीप पाटील प्रस्तुत मिले सूर मेरा तुम्हारा ऑर्केस्ट्रा टीमकडून चाहत्यांसाठी मनोरंजन म्हणून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गीत, संगीत कार्यक्रम सादर केला जात आहे.
मिले सूर मेरा तुम्हारा हा पार्श्वगायक संदीप पाटील यांनी निर्माण केलेला ऑर्केस्ट्रा असून तो सोलापूर व परिसरातील जिल्ह्यात लोकप्रिय आहे. या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विविध जयंती उत्सव, लग्न समारंभ, वाढदिवस, यात्रा यासह जल्लोषी कार्यक्रमांमधून प्रामुख्याने हिंदी, मराठी चित्रपट गीते, लोकगीते आदी गीतांच्या गायनाचे कार्यक्रम सादर केले जातात. परिणामी या ऑर्केस्ट्राचा चाहतावर्ग मोठा आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडाउनची स्थिती असताना सर्व व्यवहार ठप्प आहेत. ऑर्केस्ट्राचे नियोजित कार्यक्रमही रद्द झालेले आहेत. दरम्यान, लॉकडाउन स्थितीत घरीच थांबून असलेल्या काही चाहत्यांनी ऑर्केस्ट्राचे सर्वेसर्वा संदीप पाटील यांच्याकडे ऑनलाइन संगीत कार्यक्रमाची मागणी केली. त्यावर पाटील यांनी फेसबुक लाइव्हचा पर्याय निवडून सायंकाळी दररोज पाच ते सहा या वेळेत त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून करा ओके पद्धतीचे गीतगायन सादर करत आहेत. याप्रसंगी अनेक संगीतप्रेमी या कार्यक्रमाचा आनंद लुटताना आपल्या फर्माईश सादर करत असून पाटील त्या फर्माईश पूर्ण करत गाणी गाऊन चाहत्यांना एक वेगळी संगीत मेजवानी देत आहेत. यासाठी मिले सूर मेरा तुम्हाराची संपूर्ण टीम विशेष परिश्रम घेत आहे.
दरम्यान, संगीतप्रेमींचे मनोरंजन करतानाच या कार्यक्रमातून पाटील हे नागरिकांनी घरीच थांबावे, स्वच्छता पाळावी, प्रशासनास सहकार्य करावे, सूचना पाळाव्यात, असे आवाहन वारंवार करत कोरोना लढ्यात एकजुटीने प्रशासनास साथ देण्याची विनंतीही करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे संगीतप्रेमींमधून कौतुक होत आहे. सध्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी घरात बसण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय आहे. या पार्श्वभूमीवरच पार्श्वगायक संदीप पाटील हे दररोज किमान एक तासाचा गीतगायन कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घेत आहेत.