
कोरोनाने थांबविले महाराष्ट्र केसरीचे स्वप्न
पैलवान आप्पालाल शेख यांना गौसपाक, अशपाक आणि अस्लम अशी तीन मुले आहेत. ही तिन्ही मुले पैलवानकी करतात. आपल्या घरात असलेली महाराष्ट्र केसरीची परंपरा पुढे चालण्यासाठी तिघांनीही महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. देशावर कोरोनाचे संकट अनपेक्षितपणे आल्याने संपूर्ण विश्वच बदलून गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या रोखठोक शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. कठोर अजितदादा, कणखर अजितदादा, चुकलेल्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेत सुनावणारे अजितदादा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. संकटात असलेल्या सर्वसामान्यांच्या मदतीलाही अजितदादा धावून जातात. महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांच्या उपचारची मदतीला धावून आलेले आजितदादा पाहून अजितदादांमधील संवेदनशीलपणा आणि हळवेपणा सोलापूर जिल्ह्याने अनुभवला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) गाव हे पैलवानांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. बोरामणीतील शेख कुटुंबातील इस्माईल शेख, आप्पालाल शेख आणि मुन्नालाल शेख हे तिघे महाराष्ट्र केसरी पैलवान. त्यातील आप्पालाल शेख यांनी महाराष्ट्र केसरी होण्यापूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 125 किलो वजनी गटातून सुवर्णपदक मिळविले. कलाकार आणि खेळाडूंना त्यांचे शरीर जोपर्यंत साथ देते तो पर्यंत त्यांच्या उमेदीचा काळ असतो. शरीराने साथ द्यायची सोडायला सुरवात केल्यास हा काळ त्यांच्यासाठी कठीण आणि संघर्षाचा मानला जातो. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांना किडनीचा त्रास होऊ लागल्याने सोलापुरातील नर्मदा हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अवघ्या दहा-बारा दिवसात दवाखान्याचे बिल 50 ते 60 हजार रुपये झाले. उपचाराचा पुढील खर्च करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने शेख कुटुंबीयांनी पैलवान आप्पालाल शेख यांना बोरामणी या आपल्या गावी आणले. महाराष्ट्र केसरी पैलवानाला उपचारासाठी पैसे नाहीत, अशा बातम्या सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातून पसरल्या. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाहण्यात ही बातमी आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांना सूचना देऊन पैलवान आप्पालाल शेख यांना उपचारासाठी पुण्यात घेऊन येण्यास सांगितले. सुनील मुसळे यांनी खास रुग्णवाहिकेची व्यवस्था करून 13 जानेवारीला बोरामणी येथून आप्पालाल शेख यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचाराचा खर्चाची झळ शेख कुटुंबियांना लागू नये, याचीही काळजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली.
पैलवान आप्पालाल शेख यांच्यावर उपचार करणारे ससूनचे डॉ. अजय तावरे म्हणाले, पैलवान आप्पालाल शेख यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. येत्या दोन ते तीन तीन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.
कोरोनाने थांबविले महाराष्ट्र केसरीचे स्वप्न
पैलवान आप्पालाल शेख यांना गौसपाक, अशपाक आणि अस्लम अशी तीन मुले आहेत. ही तिन्ही मुले पैलवानकी करतात. आपल्या घरात असलेली महाराष्ट्र केसरीची परंपरा पुढे चालण्यासाठी तिघांनीही महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. देशावर कोरोनाचे संकट अनपेक्षितपणे आल्याने संपूर्ण विश्वच बदलून गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.
आप्पालाल शेख यांचे चिरंजीव गौसपाक शेख सांगतात की, आमच्या वडिलांना दरमहा सहा हजार रुपयांची पेन्शन मिळते. पैलवानकी साठी येणारा खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी ही रक्कम तुटपुंजी आहे. आम्ही तिन्ही भावांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तिघेही पैलवानकी करत आहोत. आमच्यापैकी एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घ्यावे, ही सरकारकडे आमची विनंती आहे.
संपादन : अरविंद मोटे