दहा महिन्यांपासून रखडली "दक्षिण' भाजपची कार्यकारिणी ! आमदार, पंचायत समिती ताब्यात असूनही होईना उपयोग 

BJP
BJP
Updated on

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : "कॉंग्रेसचा बालेकिल्ला' हा शिक्का पुसत दक्षिण सोलापूर तालुक्‍यात मतदारांनी भाजपला "गल्ली ते दिल्ली' सत्ता दिली. मात्र, एवढी सत्ताकेंद्रे हाती असूनही पक्षाची तालुका कार्यकारिणीच गेल्या दहा महिन्यांपासून रखडल्याने कार्यकर्त्यांमध्ये सध्या मरगळ आल्याचे चित्र आहे. 

भाजपमध्ये दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीची प्रक्रिया होते. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात जानेवारी 2020 मध्ये नवीन तालुकाध्यक्षाची निवड झाली. पंचायत समितीचे उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी यांना तालुकाध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली. तालुक्‍यात सध्या भाजपचेच वर्चस्व आहे. सत्तेच्या माध्यमातून सामान्य मतदारांपर्यंत जाण्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कार्यकारिणीत काम करण्याची संधी दिली जाते. हे बहुतांश सर्वच पक्षांत असे घडत असते. भाजपमधील कार्यकर्तेही याची गेल्या दहा महिन्यांपासून वाट पाहात आहेत. मात्र, अद्याप कार्यकारिणीच घोषित न झाल्याने या सर्वच कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. 

दर तीन वर्षांनी तालुकाध्यक्ष बदलण्याची घटनात्मक पद्धत भाजपमध्ये आहे. तालुकाध्यक्ष निवडीनंतर लगेच तालुका कार्यकारिणी निवडणे अपेक्षित होते. तीन वर्षांच्या काळात पदाधिकारी आपल्या कार्याची छाप पाडतात अन्‌ त्यातूनच नवीन नेतृत्व उदयास येते. परंतु येथे तीनपैकी एक वर्षाचा काळ तालुका कार्यकारिणी नसण्यातच गेला आहे. आता कार्यकारिणी घोषित झाल्यास केवळ दोन वर्षेच नव्या कार्यकारिणीला मिळणार आहेत. तालुकाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणीस विलंब का झाला, याचे कारण गुलदस्तातच आहे. 

तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आहेत. अशावेळी तालुका पदाधिकारीच नसतील तर गावातील कार्यकर्त्यांना बळ कोण देणार, असाही प्रश्‍न आहे. गेल्या दहा महिन्यांपासून रखडलेल्या या कार्यकारिणीबाबत खरे तर आमदार या नात्याने माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे होते, असेही कार्यकर्ते बोलत आहेत. 

सध्या राज्यातील सत्ताबदलाचा परिणाम व महाविकास आघाडीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे का, असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भाजपची सत्ता नसल्याने गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये आधीच मरगळ आहे. त्यातून आमदार व तालुकाध्यक्षांनीही दुर्लक्ष केल्याची भावना बळावते आहे. याचा फटका पक्षाला येणाऱ्या सर्वच निवडणुकांत बसण्याची शक्‍यता आहे. तालुका कार्यकारिणी रखडण्यामागे आमदार आणि तालुकाध्यक्ष यांच्यामध्ये समन्वय नाही का? अध्यक्ष आणि आमदार यांच्यात सलोखा नाही का? आमदार व तालुकाध्यक्षांना तालुक्‍यातील जातीय, राजकीय समीकरणे साधताना अडचणी निर्माण होत आहेत का? की तालुकाध्यक्षांना सक्रियताच दाखवायची नाही? असे एक ना अनेक प्रश्‍न कार्यकर्त्यांच्या चर्चेत आहेत. युवा मोर्चा, महिला मोर्चा व विविध आघाड्या यांच्या निवडीही रखडल्याने संघटनात्मक बांधणीकडे एवढे दुर्लक्ष तालुक्‍यात भाजपसारख्या पक्षाला व आमदारांना निश्‍चितच परवडणारे नाही, असे कार्यकर्ते बोलत आहेत. 

लॉकडाउनमुळे तालुका कार्यकारिणीची निवड घोषित करण्यास विलंब
याबाबत दक्षिण सोलापूर भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी म्हणाले, कोरोना महामारीचे संकट व लॉकडाउनमुळे तालुका कार्यकारिणीची निवड घोषित करण्यास विलंब झाला. त्यातून ही कार्यकारिणी करताना अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन विधानसभा क्षेत्रातील गावोगावच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा लागणार असल्यानेही विलंब झाला. मात्र आता येत्या आठच दिवसांत नवीन कार्यकारिणीची निवड व घोषणा केली जाईल. 

येत्या आठ- दहा दिवसांत केली जाईल घोषित
दक्षिण सोलापूर भाजपचे ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी म्हणाले, लॉकडाउन काळात कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे शक्‍य नव्हते. त्यामुळे तालुक्‍यातील सर्व समाजघटकांतील कार्यकर्ते कार्यकारिणीत येण्यासाठी त्यांच्या गाठीभेटी आवश्‍यक होत्या. त्यामुळे कार्यकारिणी निवडीस विलंब झाला. त्यात आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. तरीही येत्या आठ- दहा दिवसांत ती घोषित करण्याचे ठरले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com